आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांनी जाणल्या समस्या: बांधावर जाऊन जिताग्रस्त झालेल्या कष्टकऱ्यांना दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
लातूर - गारपिटीचे रखडलेले अनुदान, पीक विम्याचा प्रश्न आणि पावसाच्या उघडिपीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी बुधवारी थेट बांधावर जाऊन जिताग्रस्त झालेल्या कष्टकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
सतत तीन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने शेती अडचणीत आली आहे.
परिणामी शेतकऱ्यांचे जगणे अवघड होत आहे. अशा परिस्थितीत यंदा चांगली पर्जन्यवृष्टी होईल आणि बळीराजा सुखावेल, अशी अपेक्षा होती; परंतु निर्सगाच्या लहरीपणामुळे सर्व अाशा-आकांक्षा फोल ठरत आहेत. लातूर जिल्ह्यात दरवर्षी ८०२ मिमी पाऊस पडतो. त्यानुसार आजपर्यंत २५१ मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्यक्षात १०४ मिमी इतकच पाऊस
झाल्याने खरिपाचा हंगाम हातचा जाण्याची चिंता सतावत आहे. जिल्ह्यात फक्त जवळपास ६५ टक्के पेरणी झाली आहे. उर्वरित जमीन अजून कोरडीच आहे. ज्या भागात पेरणी झाली तेथील पिके जोमाने उगवली. पण पावसाने पुन्हा दगा दिल्याने काही भागातील पिके वाळून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावर नांगर फिरवून अन्य पीक घेण्यासाठी रान तयार केले आहे.
एकीकडे अस्मानी संकट आले असताना दुसरीकडे सुलतानी संकटाचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. गतवर्षीचे गारपिटीचे अनुदान आणि पीक विमा अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाला नाही. परिणामी सर्व बाजूंनी शेतकऱ्यांची कोंडी होत असताना जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी रेणापूर तालुक्यातील पानगाव शिवाराला भेट देऊन बांधावरच शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमावेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम आदी उपस्थित होते.
उपाययोजना करण्याच्या सूचना
पोले यांनी पाण्याअभावी सुकत असलेल्या पिकांची पाहणी करून जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली. तसेच फवारणीबाबत मार्गदर्शन करत येत्या चार दिवसांत पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी जलयुक्त शिवार अभियानात सुरू असलेल्या नाला सरळीकरण व खोलीकरणाच्या कामास भेट देऊन पाहणी केली.

शेतकऱ्याच्या तक्रारीची दखल
पानगाव येथे चर्चा सुरू असताना एका शेतकऱ्याने आपणास गारपिटीचे अनुदान, पीक विमा मिळाला नसल्याची कैफियत जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. ही तक्रार ऐकताच पोले थेट पानगाव येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पानगाव येथील शाखेत गेले. तेथे शेतकऱ्याची तक्रार आणि बँकेकडून वाटप करण्यात आलेल्या रकमेची शहानिशा करून वस्तुस्थिती जाणून घेतली आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
बातम्या आणखी आहेत...