आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Commen Marriage At Marathwada Drought Situation.

सामुदायिक विवाह सोहळ्याने दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/परतूर- दुष्काळात होरपळत असलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सोबतच भाजपच्या वतीनेही विविध उपक्रम राबवून पक्षही सरकारच्या बरोबरीने काम करत आहे. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्याचे काम केले आहे. असे उपक्रम राज्यात मोठ्या प्रमाणात घेतले जावेत, यासाठी सरकार पुढाकार घेईल, असे प्रतिपादन कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

परतूर येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात सर्वधर्मीय ४६१ जोडपी विवाहबद्ध झाली. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. यात दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी, रोजंदारी कामगार आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या विवाहाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्यानुसार रविवारी येथे विविध जाती-धर्मातील ४६१ जोडपी विवाहबद्ध झाली. त्यासाठी भव्य विवाह मंडप आणि स्वतंत्र भोजन मंडप उभारण्यात आला होता. याप्रसंगी नवविवाहितांना आशीर्वाद देण्यासाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आदी उपस्थित होते.

मोठा खर्च वाचला
गेल्या तीन-चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे लग्न तर दूरच, परंतु घरखर्चही चालवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत मंत्री बबनराव लोणीकर यांनी आमच्या मुला-मुलींच्या विवाहाची जबाबदारी स्वीकारली व मोठा विवाह सोहळा आयोजित केला. त्यामुळे आमच्या खर्चात मोठी बचत झाली असल्याची प्रतिक्रिया नववधू आणि वरांच्या पालकांनी व्यक्त केली.

माझ्यासाठी आनंदाचा क्षण
राज्यावर दुष्काळाचे संकट असताना शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी-कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींचे विवाह आपल्या हातून होत आहेत, ही मोठी समाधानाची बाब आहे. हा सोहळा पाहून समाधान वाटते आहे. भविष्यातही असे उपक्रम राबविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे या सोहळ्याचे संयोजक तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी याप्रसंगी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून आहेर
या विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांना काही कारणामुळे उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्यांनी उपस्थित जोडप्यांना वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश आणि शासनाच्या वतीने आहेर म्हणून २५ हजार रुपयांचा धनादेश पाठवला.