आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-भाजपत दुरंगी, राज्यातील सत्तेमुळे भाजपला बळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत या वेळी काँग्रेसविरुद्ध भाजप अशा लढती होणार असल्याचे बुधवारी दोन्ही बाजूंनी दिलेल्या उमेदवारांवरून स्पष्ट झाले. याअगोदर या जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा निवडी रंगायच्या. मात्र, सत्तेवर आल्यामुळे भाजपच्या गोटात बळ आले आहे.
  
भाजपने यंदाची निवडणूक ताकदीने लढण्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेस सावध झाली. त्यांनी राष्ट्रवादीसोबत औसा तालुका वगळून आघाडी करण्यात यश मिळवले. भाजप-सेनेत मतांची फाटाफूट झाली तर आघाडीचे उमेदवार सहजगत्या निवडून येतील आणि पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित होईल, असे नियोजन काँग्रेस नेत्यांनी मान्य केले. त्याचबरोबर स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांत असलेले वादही याला कारणीभूत होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपने संभाजी पाटील निलंगेकरांना मंत्रिपद देऊन त्यांच्या मागे निवडणुकीत लढण्याचे बळ दिले. 

त्याचबरोबर लातूर जिल्ह्याच्या निवडणुकांची जबाबदारीही दिली. पहिल्या टप्प्यात पालिका निवडणुकांमध्ये बाजी मारल्यानंतर संभाजी पाटील यांचा डोळा आता लातूर जिल्हा परिषद आणि १०  पंचायत समित्यांवर आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला पदच्युत करून भाजपला सत्तास्थाने मिळवून द्यायचे धोरण संभाजी पाटील यांनी ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या वेळी काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांतच लढाई होणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदपूर, चाकूर या दोन तालुक्यांमध्येच आपले उमेदवार दिले आहेत. आघाडीच्या वाटणीत त्यांच्याकडे हे दोन तालुके आले आहेत. दरम्यान, त्यांच्या भातांगळी गटातील कार्यकर्त्यांनी एकाला अपक्ष उभे करून त्याचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. मावळत्या जि.प. अध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी महापूर आणि निवळी या दोन गटांमधून अर्ज दाखल केले आहेत.  

धीरज देशमुखांवर आक्षेप याचिका  
दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र धीरज देशमुख यांनी एकुरगा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या विवरणपत्रात केवळ लातूर जिल्ह्यात असलेल्या संपत्तीचेच विवरण दिले आहे. मुंबईत त्यांच्या नावे असलेली मालमत्ता, इतर कंपन्यांचे शेअर्स याची माहिती दिली नसल्याचा आक्षेप त्यांच्या विरोधातील एमआयएमचे तय्यब अली यांनी घेतला आहे. अॅड. अण्णाराव पाटील यांच्या मार्फत त्यांनी लातूरच्या न्यायालयात धाव घेतली असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडेही आक्षेप अर्ज सादर केला आहे. बहुतांश ठिकाणचे अर्ज वैध ठरले असून निलंगा तालुक्यात केवळ चार अर्ज बाद ठरले आहेत.
बातम्या आणखी आहेत...