आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न, नागरिकांची तक्रार, हिमायतनगरमधील प्रकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - हिमायतनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील मोकळा भूखंड खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होत असून ग्रामपंचायतीने त्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी ४० नागरिकांनी बुधवारी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

साहेबराव चव्हाण, विलास वानखेडे, केवलदास सेवनकर, दशरथ डाके, संतोष वानखेडे, रामदास मदिनवार, पापा पार्डीकर आदी ४० नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गावात अगोदरच अतिक्रमण करून लोकांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा हडप केल्या आहेत. आता तर पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर असलेल्या जवळपास २ हजार चौरस फुटांच्या मोठ्या भूखंडावर ९ पिलरचे आरसीसी बांधकाम करून दुकाने बांधली जात आहेत. ग्रामपंचायतच्या संबंधितांना हाताशी धरून भूखंड हडप करण्याचा हा प्रयत्न आहे.

दिवसाढवळ्या ग्रामपंचायतीच्या भूखंडावर बांधकाम होत असून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. सध्या जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. राजकीय नेते व अधिकाऱ्यांना हाताशी धरून गावठाण, गायरान, स्मशानभूमी, देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचा राजरोस धंदा तालुक्यात सुरू आहे; परंतु राजकीय वरदहस्तामुळे त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

भाडेतत्त्वावर दिला
यासंबंधात ग्रामविकास अधिकारी शंकर गर्दसवार यांना विचारले असता, हा भूखंड सय्यद नईम सय्यद खुदुस यांना वार्षिक ३६०० रुपये भाडेतत्त्वावर तात्पुरत्या वापरासाठी दिला आहे. बांधकामाचा कोणताही परवाना त्यांना दिलेला नाही. अवैध बांधकाम करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सरपंच गंगाबाई शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर अतिक्रमणधारकाला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. बांधकाम पाडून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामविकास अधिकारी बांधकामाचा पंचनामा करून कायदेशीर कारवाई करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.