आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईओ खोडवेकरांना सक्तीची रजा, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- स्वच्छ भारत अभियानात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर यांची राज्य शासनाकडून चौकशी सुरू असून चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (दि.११) विधानसभेत जाहीर केला.  

आ. डॉ. राहुल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून खोडवेकर यांनी २०१६-१७ या काळात केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांना निलंबित करून त्यांच्यावर एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीवर ग्रामविकास मंत्री मुंडे यांनी ही माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानात लाभार्थीने शौचालयाचे बांधकाम केल्यानंतर १२ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थींच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना असताना खोडवेकर यांनी सिद्धेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, एरंडेश्वर व सरस्वती महिला बचत गट, दुर्डी या मर्जीतील दोन संस्थांना प्रतिलाभार्थी सात हजार रुपये प्रमाणे ३ कोटी ३५ लाख रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून वितरित केले. १५ ऑगस्टपर्यंत शौचालयांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट असतानाही अद्यापपर्यंत दोन्ही संस्थांनी एकही शौचालय बांधले नसल्याचे लेखी अहवाल ग्रामसेवकांनी सादर केले आहेत. ही रक्कम देत असताना शासनाच्या आदेशांची पायमल्ली केली गेली आहे. संयुक्त खाते असताना उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची सही न घेता केवळ स्वत:च्या स्वाक्षरीने ३ कोटी २३ लाख रुपये दिले. 

शासन निर्णयानुसार लाभार्थीने शौचालयासाठी स्वत: साहित्य खरेदी करणे आवश्यक असताना खोडवेकर यांनी सर्व साहित्य मर्जीतीलच दुकानदारांकडून खरेदी करण्याची सक्ती केली. बांधकामे पूर्ण नसतानाही विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दमदाटी करून बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्याची दमदाटी केली, अशा प्रकारचे गैरप्रकार श्री खोडवेकर यांनी केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...