आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत क्रिकेट सामन्यावरून वाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या दगडफेकप्रकरणी आयोजकांसह इतर सत्तर जणांविरुद्ध शहर पोलिसात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बुधवारी परळी शहर बंद ठेवण्यात आले. शहरात पोलिस व दंगल नियंत्रक पथके तैनात करण्यात आले आहे.

येथील अमर मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दुपारी परळी व परभणी संघात अंतिम सामना सुरू असताना पंचाच्या निर्णयावरून दोन्ही संघ व त्यांच्या समर्थकांमध्ये दगडफेक झाली. दोन संघातील वाद दोन समाजांत गेला होता. पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, प्रशांत देशपांडे व कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे यांनी दोन्ही जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला होता. दगडफेकप्रकरणी कोणाचीही फिर्याद नसल्याने पोलिस उपनिरीक्षक सुरेश डांगे यांच्या तक्रारीवरून आयोजकासह सत्तर जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी प्रदीप मुंडे, शेख नासेर, जलिंदर माने, महेश बागवाले, महादेव शेटे, श्रीकांत बळवंत, प्रल्हाद येनगे, विनोद माने, इसाक सिराजोद्दीन आदी नऊ जणांना अटक केली .

दरम्यान, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा व अटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या आवाहनानुसार बुधवारी परळी शहर बंद ठेवण्यात आले. विद्यार्थी व युवकांवरील गुन्हे रद्द करावेत संबंधित पोलिस अधिका-या ला निलंबित करावे, अशी मागणी करण्यात आली. या वेळी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी.पी. मुंडे, भाजपचे जीवराज ढाकणे, भीमराव मुंडे, राष्ट्रवादीचे राजेश गित्ते आदी उपस्थित होते.