आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे माजी महापौर अख्तर मिस्त्री राष्ट्रवादीमार्गे भाजपमध्ये!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे पदच्युत व्हावे लागलेले काँग्रेसचे माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी याच अख्तर मिस्त्री यांनी बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे उपरणे गळ्यात घालून घेतले होते. मात्र, राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगणे टाळले होते.

प्रभाग क्रमांक एकमधून अख्तर मिस्त्री काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. दुसऱ्या अडीच वर्षांच्या कालावधीत ओबीसी संवर्गातून महापौर झाले होते. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जात प्रमाणपत्राच्या सत्यतेबद्दल तक्रारी केल्या. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आणि निकाल मिस्त्री यांच्याविरोधात गेला. त्यानंतर मिस्त्रींना पायउतार व्हावे लागले. या सर्व प्रकरणाला पक्षाअंतर्गत विरोधकांची फूस होती आणि आमदार अमित देशमुखांनी त्यांना आवर घातला नाही, अशी मिस्त्री यांची भावना झाली होती. मधल्या काळात ते काँग्रेस पक्षापासून अंतर राखून होते. प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारातही ते दिसले नाहीत. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह बारामतीला जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. त्यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे पक्षचिन्ह असलेले उपरणे गळ्यात घालतानाचे छायाचित्रही व्हायरल झाले. मात्र, अधिकृत घोषणा व्हायच्या आधीच त्यांनी भाजपची वाट धरली.
  
चाकूरकर समर्थकही भाजपत  : ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेले राजेश्वर बुके यांनीही बुधवारी भाजपत प्रवेश केला. औसा तालुक्यातील गोंद्री येथे त्यांचा खासगी साखर कारखाना आहे. विधानसभेलाच त्यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता ते भाजपत गेले आहेत. काँग्रेसमधील चंद्रकांत बिराजदार, राष्ट्रवादीचे संगीत रंदाळे यांनीही भाजपची वाट धरली आहे. 
बातम्या आणखी आहेत...