आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमधील गळतीवर खासदार राहुल गांधींंच्या मेळाव्याचा उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- नांदेड महापालिकेची निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासूनच आयाराम, गयारामांनी पक्षांतराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत विद्यमान ८१ पैकी १५ नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. त्यातील ११ जणांनी तर यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरित चार नगरसेवकही भाजपच्या वाटेवर आहेत.  काँग्रेसच्या पाच जणांनी  भाजप प्रवेश केला आहे. या गळतीमुळे काँग्रेसला आगामी महापालिकेची निवडणूक जड जाणार आहे. ही गळती रोखण्यासाठी व पक्षाला उभारी देण्यासाठीच राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील विभागीय मेळाव्याची मात्रा लागू  पडेल असे दिसते.

केंद्रात व राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात नगार पालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपने  मुसंडी मारली आहे. मात्र, याला नांदेड अपवाद ठरले आहे. पालिका निवडणुकीतही काँग्रेसने वर्चस्व टिकवून ठेवले तर  जिल्हा परिषद ताब्यात ठेवण्यातही यश मिळवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही आमदार अमर राजूरकर यांना पुन्हा निवडून आणण्यात खासदार अशोक चव्हाण  यशस्वी झाले आहेत. आता महापालिका निवडणूक जाहीर झाल्याने भाजपने ही निवडणूक कुठल्याही पद्धतीने जिंकायचीच, असा पण केला आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीआधीच फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, महानगर प्रमुख बाळू खोमणे यांच्यासह आठ नगरसेवकांनी राजीनामा देऊन भाजपचा रस्ता धरला आहे. राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांचे चिरंजीव नवल यांच्यासह पाच नगरसेवकांनीही काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतल्याने सत्ता टिकवण्याचे चव्हाणांपुढे  आव्हान आहे.  

भाजप-शिवसेना वादात काँग्रेसला लाभ
सध्या भाजपात गेलेल्या १५ नगरसेवकांत शिवसेनेचे ८ नगरसेवक आहेत.  दोन्ही पक्षांत युती असली तरी भाजपने शिवसेनेचे आठ नगरसेवक फोडले आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती न झाल्यास ती काँग्रेसच्या पथ्यावर पडणार आहे.

चिखलीकरांच्या भूमिकेकडे लक्ष
चव्हाणांचेे कट्टर विरोधक म्हणून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ओळख आहे.  तेही भाजपमध्ये जाणार असल्याचे व सेना नगरसेवकांचा भाजपमध्ये त्यांनीच घडवल्याचे बोलले जाते. आता ऐन निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. 

भाजपमध्ये जुन्या- नव्यांत वाद
मूळचे भाजपचे अन् आता अन्य पक्षातून नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्यांत वाद सुरू झाला आहे. भाजपमधील ज्यांनी वर्ष-दोन वर्षापूर्वीपासूनच महापालिका निवडणुकीची तयारी केली होती त्यांची या  आयारामांमुळे अडचण झाली आहे. त्यामुळे नवे विरूद्ध जुने असा अंतर्गत वाद सुरू झाला आहे. आगामी काही दिवसांत भाजपमधील या अंतर्गत धुसफुशीचा अशोक चव्हाण हे नक्कीच फायदा करून घेतील, अशी चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत.
बातम्या आणखी आहेत...