आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसची कुरघोडी; काँग्रेसच्या नाकी नऊ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.बाळासाहेब जामकर व सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या प्रवेशानंतर काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. सर्वार्थाने सक्षम असलेल्या या दोघांच्या विरोधात तितक्याच ताकदीचे सक्षम उमेदवार देण्यासाठी काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. हे दोघे अनुक्रमे जाम व उखळी गटांतून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे. माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी पाच वर्षात ही पकड कायम राखली. काँग्रेसला फोडून ही पकड अधिकच मजबूत करण्याचाही त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यातून मागील जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड. बाळासाहेब जामकर यांच्यासह चौघा सदस्यांना फोडून त्यांनी जामकर यांना उपाध्यक्षपद दिले. काँग्रेसच्याच अधिकृत उमेदवाराचा जामकर यांनी जिल्हा परिषदेत पराभव केल्याने त्यांचे काँग्रेसचे संबंध तेव्हापासूनच दुरावले. त्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बाजार समितीचे माजी सभापती विजय जामकर यांनी काँग्रेस व शिवसेनेच्या पॅनेलऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक साधली. या दोन निवडणुकांत जामकर बंधूंनी काँग्रेसअंतर्गत कलहातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वरपुडकर यांच्याशी सख्य साधले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उपाध्यक्ष बाळासाहेब जामकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारच हे निश्चितच झाले होते. त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी दोन दिवसांपूर्र्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ते त्यांच्या मूळ गाव असलेल्या जाम गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यादृष्टीने त्यांनी व्यूहरचनाही केली आहे. त्यांचे जाम गटात वर्चस्व असल्याने काँग्रेसला तेथे उमेदवार देखील मिळणे दुरापास्त झाले आहे.
माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते अ‍ॅड.तुकाराम रेंगे पाटील यांच्यावर काँग्रेसने या मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे जाममधीलच ही लढाई चुरशीची करण्याच्या दृष्टीने रेंगे पाटील कोणता सक्षम उमेदवार देतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आाहे. अ‍ॅड. रेंगे यांचे चिरंजीव व युवक काँग्रेसचे लोकसभा उपाध्यक्ष बाळासाहेब रेंगे यांच्या नावाची मध्यंतरी जोरदार चर्चा होती. मात्र, हेही नाव मागे पडले आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कितपत सक्षम उमेदवार येईल, याबाबत साशंकताच व्यक्त केली जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतरामुळे येणार रंगत
जिल्हा परिषदेचे काँग्रेसचेच दुसरे सदस्य व सोनपेठ तालुक्यातील युवक नेते राजेश विटेकर यांनीही काँग्रेसला सोडून नुकताच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असलेले विटेकर हे माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचे चिरंजीव आहेत. काँग्रेसच्या सोनपेठमधील स्थानिक राजकारणातून तसेच पाथरी विधानसभा मतदारसंघातील आगामी राजकारणाच्या पाश्वर्भूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणुकीतच ते अपक्ष अथवा शिवसेनेच्या उमेदवारीवर रिंगणात येण्याची शक्यता होती. परंतु ते याबाबींपासून दूर राहिले. नुकत्याच झालेल्या सोनपेठ पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचार केला होता. ते उखळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.