आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress News In Marathi, Adarsh Housing Scam, Ashok Chavan, Gandhi

काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे ‘आदर्श’तून वस्त्रहरण;नाव अशोक चव्हाणांचे, रोख राहुल गांधींवरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मराठवाड्यातील पहिल्याच प्रचारसभेत ‘आदर्श’ प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व कॉँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर सभेला गर्दी जमते की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात असताना श्री गुरुगोविंदसिंगजी स्टेडियमने ओसंडून वाहणा-या गर्दीचा अनुभव घेतला. मराठवाड्यात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर प्रथमच गर्दीचा उच्चांक साधणा-या सभेचा मान मोदींना मिळाल्याचे यावरून स्पष्ट झाले.


‘आदर्श’चा मुद्दा गेली पाच वर्षे गाजत आहे. टूजी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घोटाळा या मालिकेतच आदर्श प्रकरणही देशभर गाजत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर देशभर चौफेर टीका होत आहे. या टीकेकडे दुर्लक्ष करीत काँग्रेसने त्यांना नांदेडमधून उमेदवारी दिली. त्यामुळेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे वस्त्रहरण करण्यासाठी नांदेडसारखे योग्य ठिकाण नाही, हे चाणाक्ष मोदींना पक्के माहीत होते. म्हणूनच काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्यासाठी त्यांनी राज्याच्या पहिल्या प्रचार दौ-यात नांदेडचीच निवड केली.


सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी ‘दिल्लीहून फोन आल्यामुळे सीबीआयने बेनामी फ्लॅटच्या आरोपातून चव्हाणांच्या नातेवाइकांची नावे गाळली’ असा गौप्यस्फोट केला. त्यानंतर मोदी ‘आदर्श’वर काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मोदींनी अत्यंत चतुराईने चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात त्यांना आरोपीच्या पिंज-यात उभे करून राहुल गांधींवर निशाणा साधला. ‘आदर्श’च्या मुद्द्यावरून चव्हाणांवर केलेल्या टीकेचा त्यांच्यावर परिणाम होवो अथवा न होवो, मात्र या निमित्ताने काँग्रेस किती भ्रष्ट आहे हे लोकांसमोर पुन्हा मांडण्यात मोदी यशस्वी झाले, काँग्रेसचे सर्व उमेदवार ‘आदर्श’च आहेत हे सांगून त्यांनी अप्रत्यक्षपणे चव्हाणांपासून पवन बन्सल यांच्यापर्यंत सर्वांनाच लक्ष्य केले.


शहजादे, उत्तर द्या !
राहुल गांधींचा समाचार घेताना मोदी म्हणाले, ‘शहजादे, भ्रष्टाचाराबाबत समझोता केला जाणार नाही, असे आपण म्हणालात की नाही? चव्हाणांवर कारवाई होईल असे सांगितले की नाही? मग उमेदवारी देणे ही त्यांच्यावरील कारवाई ठरते का? काँग्रेस किती निर्लज्ज आहे पाहा ! चव्हाणांवर निवडणूक लढवण्यास बंदी नाही, असे काँग्रेस नेते सांगत आहेत...’ हे ठासून सांगत मोदींनी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर पांंघरूण घालण्याच्या कृतीवर वार केला.


चव्हाण यांनी हिसकावले मेहुण्याचेच तिकीट
अशोक चव्हाणांवर घणाघाती टीका करताना मोदींनी लोकांच्या भावनेलाही हात घातला. ‘मुलीच्या घरी पाणीसुद्धा प्यायचे नाही, अशी आपली संस्कृती सांगते. भावाने बहिणीला द्यायचे असते, परंतु अशोक चव्हाणांची सत्तेची भूक किती आहे पाहा, त्यांनी आपल्या बहिणीच्या घरचेच हिसकावून घेतले,’ असे सांगत भास्करराव पाटील खतगावकरांचे तिकीट कापून चव्हाणांनी उमेदवारी मिळवल्याकडे मोदींनी जनतेचे लक्ष वेधले.