आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘भाऊजीं'च्या चर्चेने लातूर काँग्रेस अस्वस्थ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ कसं करायचं हे लातूरकरांकडून शिकायला हवं. सकाळचं लातूर सायंकाळी कधी फितूर होईल याचा नेम नाही, असं लातूरबद्दल म्हटलं जात ते काही उगीच नाही. या निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून कुणाला उमेदवारी द्यायची यावरून संभ्रम होता. त्यावर कडी म्हणून की काय आता भाजपच्या गोटातून आलेल्या बातमीमुळे काँग्रेसजन पुरते अस्वस्थ झाले आहेत. निमित्त घडलंय ते दक्षिण कराडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात लढणारे भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांचं.

विषय लातूर काँग्रेसमधील अस्वस्थतेचा सुरू असतानाच मध्येच दक्षिण कराडमधील भाजप उमेदवाराचा काय संबंध, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. त्याला कारणही तितकंच मोठं आहे. कराडचे अतुल भोसले हे लातूरच्या देशमुख कुटुंबीयांचे जावई आहेत. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे बंधू माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या कन्या गौरवी यांचा विवाह अतुल भोसले यांच्यासोबत झालेला आहे. या नात्याने अतुल भोसले काँग्रेसचे लातूर शहरमधील उमेदवार अमित देशमुख यांचे भाऊजी.
लातूरच्या भाजपतील काही मंडळींनी अमित देशमुखांच्या विरोधात भाजपच्या तिकिटावर थांबलेल्या शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी अतुल भोसले यांना पाठवा, अशी मागणी प्रदेश भाजपकडे केली आहे. विशेषकरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवण्यात आला आहे. कौटुंबिक नात्यात राजकारण आणायचे नाही ही परंपरा लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी जोपासली आहे. त्यामुळे अतुल भोसले लातूरला येऊन मेहुणे असलेल्या अमित देशमुख यांच्या विरोधात प्रचार करणार नाहीत हे उघड आहे. मात्र, भाजपच्या गोटातून सुरू झालेल्या या चर्चेमुळे लातूरची काँग्रेस पुरती घायाळ झाली आहे. नरेंद्र मोदींविरोधात बोलता येईल, अमित शहांविरोधात बोलता येईल, मात्र जावई, मेहुणे असलेल्या अतुल भोसलेंच्या विरोधात कसं बोलायचं, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

कोण आहेत अतुल भोसले
अतुल भोसले यांचा कराडमधील कृष्णा साखर कारखाना, कृष्णा हॉस्पिटल्स या माध्यमातून संपर्क आहे. गेल्या वेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवली होती. त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते. मधल्या काळात त्यांचा विवाह गौरवी देशमुख यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, काँग्रेस दक्षिण कराडमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देणार असल्याच्या बातमीनंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वीच भाजपत प्रवेश केला. ते आता मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपकडून लढणार आहेत.