आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेस नंबर एकचा पक्ष; राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचा मंगळवारी (दि.१७) फैसला झाला. अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राबल्य वाढल्याचे दिसून आले. तुलनेने शिवसेनेची पीछेहाट झाली असून, उमरगा, लोहारा, तुळजापूरसह वाशी तालुक्यात काँग्रेसने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायती मिळविल्या. भाजपने २० ग्रामपंचायतीमध्ये कमळ फुलवले आहे. मात्र, पक्षाने ३२ ग्रामपंचायतीवर सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. उस्मानाबाद तालुक्यातील प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या तेरमध्ये राष्ट्रवादीच्या सर्वाधिक १५ जागा आल्या असल्या तरी सरपंचपद सर्वपक्षीय आघाडीकडे गेल्याने हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

जिल्ह्यातील १६१ ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सोमवारी(दि.१६) पार पडली. मंगळवारी निकाल जाहीर झाला. या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेना-भाजपने वेगवेगळे दावे केले असले तरी मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार जिल्ह्यात काँग्रेसने जबरदस्त यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. नांदेड येथील महापालिका निवडणुकीतील निकालाचा काँग्रेससाठी चांगला इफेक्ट ग्रामपंचायत निवडणुकीत झाल्याचे दिसून आले. गावपातळीवरच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षालाही प्रथमच घवघवीत यश मिळाले. जिल्ह्यातील सुमारे २० ग्रामपंचायतीवर भाजपने कमळ फुलवले आहे. भूम तालुक्यातील २ ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यापैकी वारेवडगाव ग्रामपंचायत भाजपने तर वांगी खुर्द ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली. वाशीमध्ये चारपैकी ३ काँग्रेसने, १ ग्रामपंचायत राष्ट्रवादीने पटकावली. उमरगा तालुक्यात २२ ग्रामपंचायतीची निवडणूक होती. त्यापैकी २ बिनविरोध निघाल्या होत्या. 

निवडणुकीत काँग्रेसने १०, राष्ट्रवादी ५,शिवसेनेने ४, आणि भाजपने १ ग्रामपंचायत जिंकली.विशेष म्हणजे भाजपचे तालुकाध्यक्ष असलेल्या माधव पवार यांच्या कोराळ गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. तुळजापूर तालुक्यात ४८ पैकी ३२ ग्रामपंचायती काँग्रेसने पटकावल्या. ९ राष्ट्रवादीने, ४ भाजपने तर ३ ग्रामपंचायती अन्य आघाड्यांनी ताब्यात घेतल्या. कळंब तालुक्यात ३० पैकी सर्वाधिक शिवसेनेकडे १३ ग्रामपंचायती गेल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १०, भाजप-काँग्रेसकडे प्रत्येकी २ आणि सर्वपक्षीय आघाडीकडे ३ ग्रामपंचायती आल्या. लोहारा-१३ ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.त्यात ७ काँग्रेसने, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी तीन ग्रामपंचायती मिळविल्या. परंडा तालुक्यातील एका गावची निवडणूक झाली. शिवसेनेनेही ही जागा जिंकली.उस्मानाबाद तालुक्यात सर्वाधिक ४५ ग्रामपंचायतीची निवडणूक होती.त्यापैकी भाजपने १२, राष्ट्रवादीने ११ ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला. शिवसेनेने ११, काँग्रेसने ३, अाम आदमी पक्षाने १ तर अन्य आघाड्यांनी ५ ग्रा.पं.वर आपले वर्चस्व निर्माण केले. 
बातम्या आणखी आहेत...