आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचा रेल्वे रोको; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - केंद्र सरकारने रेल्वेच्या प्रवाशी व मालवाहतूक भाड्यात केलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने बुधवारी (दि. 25) उस्मानाबाद स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने रेल्वेच्या प्रवाशी भाड्यात 14.2 टक्के तर मालवाहतूक भाड्यात 6.5 टक्के दरवाढ केली आहे. सर्वसामान्यांचे प्रवासाचे एकमेव साधन रेल्वे आहे. भाडेवाढीमुळे देशातील जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है’ म्हणणार्‍या मोदी सरकारने फसविले आहे, असा आरोप काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आला. रेल्वे दरवाढीपाठोपाठ येत्या काळात गॅस, पेट्रोल, डिझेल, साखर व इतर वस्तूंचेही दर वाढविण्याकडे केंद्र शासनाचा कल दिसत आहे. काँग्रेसच्या वतीने रेल्वे दरवाढीच्या निषेधार्थ रेल्वे रोको आंदोलन करून केंद्र शासनाला इशारा दिला असल्याचे अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच या आंदोलनानंतर सरकारने भानावर येऊन दरवाढ रद्द करावी, अन्यथा या प्रश्नावर रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनामध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, मुख्य संघटक राजेंद्र शेरखाने, तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष समीयोद्दीन मशायक, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राजलक्ष्मी गायकवाड, विलास शाळू, मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, दत्ता सोनटक्के, सिद्धार्थ बनसोडे, दर्शन कोळगे, दीपक जवळगे, धनंजय राऊत, उमेश राजे, शिला उंबरे आदी सहभागी झाले होते.
10 मिनिटे आंदोलन
आंदोलनासाठी जिल्हाभरातून काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने रेल्वेस्थानकावर जमा झाले होते. सकाळी 11.40 वाजता आलेली लातूर- पुणे ही रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर इंजिनवर चढून तसेच रुळावर उभारून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 10 मिनिटे रेल्वे रोखून धरली. त्यानंतर पोलिसांनी रेल्वेवर चढलेल्या तसेच रुळावरील कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने रेल्वे पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर रुळावर उभारून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुन्हा घोषणाबाजी केली.
दोन पदाधिकार्‍यांमध्ये धक्काबुक्की
जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनादरम्यान काँग्रेसच्याच दोन आजी-माजी पदाधिकार्‍यांमध्ये वाद होऊन धक्काबुक्की झाली. पैशाच्या व्यवहारातून हा वाद झाल्याचे कळते. यावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. दर्शन कोळगे व ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी होऊन अर्वाच्य शिवीगाळपर्यंत प्रकरण तापले. यावेळी पक्षाच्या महिला पदाधिकारी, ज्येष्ठ पदाधिकारी तेथेच होते, परंतु, कोणीही हस्तक्षेप केला नाही. दरम्यान या वादात अ‍ॅड. कोळगे यांच्या गाडीची काचही फुटली.