आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन: नुसताच गाजावाजा, प्रत्यक्षात दिले फक्त निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत निरीक्षकांनी केला होता दावा
लातूर- चार दिवसांपूर्वी डझनभर नेत्यांच्या उपस्थितीत कर्नाटकातून आलेल्या निरीक्षकांनी नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्ष लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. मात्र शुक्रवारी प्रत्यक्षात टाऊन हॉल मैदानावर एकत्रित जमलेल्या कार्यकर्त्यांनी ५०० मीटर अंतरावरील तहसील कार्यालयात जाऊन निवेदन दिले अन् आंदोलन संपले.
  
नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील जनता त्रस्त असल्याचे सांगत काँग्रेस पक्षाने चार दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन दोन आंदोलने करणार असल्याचा दावा केला होता. शुक्रवार आणि रविवार अशा दोन दिवशी वेगवेगळे आंदोलने होणार असून त्यामुळे सरकार खडबडून जागे होईल, असे सांगण्यात आले होते. कर्नाटकातल्या हसन जिल्ह्यातून आलेले केंद्रीय निरीक्षक बसवराज ए. पी. यांनी रविवारी घंटानाद आंदोलन होईल, असे सांगितले. मात्र शुक्रवारचे आंदोलन गुप्त ठेवण्यात आले असून ते ऐनवेळी जाहीर करण्यात येईल, असे सांगितले होते. पक्षाचे जिल्हा निरीक्षक माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, टी. पी. मुंडे यांनीही त्या दिवशी खळबळ माजेल, असे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे गेले चार दिवस काँग्रेस नक्की काय आंदोलन करणार, याकडे लातूरकरांचे लक्ष लागले होते. 
 
भ्रमाचा भोपळा फुटला  
शुक्रवारी सकाळपासून काँग्रेसचे मोजके नेते आणि कार्यकर्ते टाऊन हॉल या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मैदानात जमले. आता आंदोलन होईल, मग आंदोलन होईल या प्रतीक्षेत असतानाच केवळ तहसीलदारांना निवेदन देणार असल्याचे ऐनवेळी घोषित करण्यात आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला. बसवराज ए.पी., जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, शहराध्यक्ष मोईज शेख यांच्यासह इतर कार्यकर्ते घोषणा देत ५०० मीटर अंतरावर असलेल्या तहसीलदारांकडे गेले. तेथे निवेदन देण्यात आले आणि अर्ध्या तासात आंदोलनाचा खेळ संपला. कायम सत्तेत राहिलेल्या काँग्रेस पक्षाला आंदोलनांचा अनुभव नसल्यामुळे येत्या रविवारी आंदोलन कसे होईल, याची उत्सुकता लागली आहे.

मोदी सरकार हाय हाय, घोषणांनी परिसर दुमदुमला, नांदेडच्या धरणे आंदोलनात अशोक चव्हाण आलेच नाहीत
नांदेड- केंद्र शासनाने घेतलेल्या पाचशे आणि हजारच्या नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार हाय-हाय, शेंडी सरकार हाय-हाय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. हे आंदोलन माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली होणार होते. मात्र, ते न आल्यामुळे  आंदोलनाचे नेतृत्व आमदार अमर राजूरकर, अमिता चव्हाण, वसंत चव्हाण, डी. पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर आदींनी केले.  जिल्हा परिषद निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या असल्यामुळे या आंदोलनात कार्यकर्ते, पदाधिकारी, इच्छुक उमेदवारही कार्यकर्त्यांसह शक्तिप्रदर्शन करीत सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेसह, मजूर, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, परभणीत काँग्रेसचे प्रशासनास निवेदन
परभणी- नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला असून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच केंद्र सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. सहा) जिल्हा प्रशासनास देण्यात आले.
  
माजी मंत्री तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, उपमहापौर भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख, इरफानूर रहेमान खान, नगरसेवक सुनील देशमुख, आकाश लहाने, विनोद कदम आदींनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनास निवेदन दिले. काँग्रेसने नोटाबंदीच्या ५० दिवसांनंतर राज्यभरात आंदोलन हाती घेतले असून पहिल्या टप्प्यात प्रशासनास नोटाबंदीसह भ्रष्टाचाराच्या विरोधात निवेदन दिले. यानंतर महिला, युवकांचा मोर्चा, थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे. एका बाजूला नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी यांच्यावर सहारा व बिर्ला समूहाकडून पैसे घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे.या बाबी देशाच्या दृष्टीने गंभीर असून भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी निष्पक्ष चौकशी होण्याची गरज काँग्रेसने व्यक्त केली आहे.
 
नोटबंदीमुळेही अनेक घोटाळ्याची प्रकरणे समोर आली असून यात भाजपच्या नेतेमंडळींची नावे आली आहेत. राज्यासह देशात अशी अनेक प्रकरणे नोटबंदीनंतर समोर आली आहेत,  अशा भाजप पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी तसेच या नोटबंदीमुळे ५० दिवसांत ११५ लोकांचा मृत्यू झाला असून सर्वसामान्यांना या नोटबंदीची मोठी झळ बसल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...