आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा-मराठेतरांत दुहीचा मोदींचा डाव: परभणी मेळाव्‍यात राहुल गांधीचा सनसनाटी आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड / परभणी- नरेंद्र मोदी सरकार महाराष्ट्रात मराठा आणि मराठेतर तर हरियाणात जाट व जाटेतर जातींमध्ये दुही निर्माण करत आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी नांदेड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व परभणी येथे आयोजित संघर्ष सभेत केला. नोटाबंदीमुळे ना दहशतवाद थांबला, ना काळ्या पैशावर लगाम लावला गेला. उलट सामान्य माणूस भरडला गेला, असेही राहुल म्हणाले.

केंद्र सरकारचे जीएसटीबाबतचे धोरण अत्यंत घातक असल्याचे सांगून या धोरणामुळे छोटे दुकानदारच संपतील, अशी भीती राहुल यांनी व्यक्त केली. राहुल यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने नोटाबंदी आणि जीएसटीवरच अधिक भर दिला. नांदेडमध्ये माेंढा मैदानावर काँग्रेसच्या विभागीय मेळाव्याचे अायाेजन करण्यात अाले हाेते. वर्षभरानंतर मराठवाड्यात प्रथमच राहुल यांची सभा होत असल्याने विभागातील कार्यकर्त्यांनी मेळाव्याला गर्दी केली हाेती. राहुल यांनी संपूर्ण भाषणात केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र माेदी व भाजपला लक्ष्य केले.  

पैशाच्या जोरावर सत्ता
पंतप्रधान माेदी देशात फाेडाफाेडीचे राजकारण करत असल्याचा आरोप करून मणिपूरमध्ये पैशांच्या जाेरावर भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप राहुल यांनी केला. गुजरातच्या राज्यसभा निवडणुकीतही भाजपने पैशांच्याच जाेरावर अामदारांना फाेडण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले.
 
जीएसटी काँग्रेसचीच संकल्पना
जीएसटीची मूळ संकल्पना काँग्रेसचीच आहे. त्यात १८ % पेक्षा जास्त कर अपेक्षितच नाही. मोदी सरकारने मात्र, काही बड्या ५० उद्योगपतींना सांभाळण्यासाठी या कराचा बोझा २८ टक्क्यांपर्यंत नऊन ठेवला. भाजपचे जीएसटी धोरण छोट्या दुकानदारांना संपवणारे असल्याचा अाराेप राहुल यांनी परभणीत नूतन विद्यालयाच्या मैदानावर अायाेजित संघर्ष सभेत केला.

एक इंचही मागे हटणार नाही
भाजप, अारएसएसच्या विचारप्रणालीशी काँग्रेस सातत्याने लढा देत अाहे. या लढ्यात एक इंचही मागे हटणार नाही. या लढाईत त्यांना हरवून दाखवू, असा विश्वासही राहुल यांनी परभणीच्या सभेत व्यक्त केला.

केवळ ५ हजार काेटींचीच कर्जमाफी
तीन वर्षांत महाराष्ट्रात ९ हजार शेतकऱ्यांनी अात्महत्या केली. ३५ हजार काेटींची कर्जमाफीची फसवी घाेषणा असून प्रत्यक्षात केवळ ५ हजार काेटींचीच कर्जमाफी असल्याचे राहुल म्हणाले. माेदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नॅनाे कारखान्यासाठी ६५ हजार काेटी दिले. प्रत्यक्षात एकही नॅनाे रस्त्यावर धावत नाही. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसे का नाहीत, असा प्रश्न राहुल यांनी केला.

विकासदरही घटला
नाेटबंदीमुळे देशातील सामान्य माणूस प्रचंड भरडला गेल्याचे सांगून या नोटाबंदीमुळे दहशतवाद थांबेल, असे सांगितले जात होते. मात्र, हा दहशतवाद थांबलाच नाही. शिवाय, काळ्या पैशांवर लगाम लावण्यातही माेदी अपयशी ठरल्याचे राहुल म्हणाले. या निर्णयामुळे उलट देशाचा विकास दर ४.५ टक्क्यांवर घसरल्याचा दाखला त्यांनी दिला.  या वेळी बोलताना माेदी सरकार हे लाइन लगाव सरकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी केली.

नमाज सुरू झाल्यावर चार मिनिटे थांबवले भाषण
परभणीत सभेदरम्यान राहुल यांनी भाषण सुरू केल्यावर नमाज पठण एेकू अाल्याने त्यांनी ४ मिनिटे भाषण थांबवत पाणी मागितले. हर्षवर्धन पाटील यांनी त्यांना बाटली दिली. मात्र, सुरक्षा रक्षकांनी राेखले. तेव्हा राजीव सातव यांनी गांधी यांच्या खुर्चीसमाेर ठेवलेली बाटली दिली. पाणी पिण्याएेवजी राहुल यांनी बाजूला कुंडीमध्ये हे पाणी टाकले व भाषणाला पुन्हा सुरुवात केली.

मी ५ हजार कोटी देतो, कर्जमाफी करून दाखवा : मुख्यमंत्री
राज्यात केवळ ५ हजार कोटींचीच कर्जमाफी झाल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. त्यांच्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘१५ वर्षे महाराष्ट्रात त्यांचेच सरकार होते. शेतकरी अडचणीत अाणण्याचे त्यांचेच पाप आहे, आम्ही त्यात सुधारणा करतोय. मी ५ हजार कोटी राहुल गांधींना देतो, त्यांनी कर्जमुक्ती करून दाखवावी’, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘राहूल यांना शेतीची माहिती असती तर राज्यात आणि देशात ही स्थिती निर्माण झाली नसती’, असा टोलाही त्यांनी  लगावला.
बातम्या आणखी आहेत...