आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस-सेनेतील तडजोड, बाजार समितीत सत्तापदांची अडीच वर्षांची वाटणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी : पण मान कोणाला....
समितीवर वर्चस्व स्थापित करतानाच सभापती व उपसभापतिपद हे दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी अडीच वर्षे राहणार असल्याचे स्पष्टच झाले आहे. पक्षीय बलाबल व तडजोडीत ठरल्याप्रमाणे हे निश्चित असले तरी प्रथम सभापती कोण, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्याच्या तीन नेत्यांनी काँग्रेस व शिवसेनेची मोट जुळवून आणत आपल्या समर्थक, कार्यकर्त्यांची वर्णी लावली. पॅनलची उभारणी करतानाच दोन्ही पक्षांना वाटणी समसमान केली असली तरी सभापतिपदाबाबतही काही अर्थपूर्ण समीकरणेही आधीच जुळवल्याने आता सभापती व उपसभापतिपदांचीही वाटणी प्रत्येकी अडीच वर्षांची राहणार आहे. त्यातही सभापतिपदाचा मान पहिल्यांदा काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे खा.संजय जाधव व आ.डॉ.राहुल पाटील यांनी सुरुवातीपासून बाजार समितीच्या निवडणुकीची समीकरणे मांडताना ही निवडणूकच बिनविरोध करण्याचे आटोकाट प्रयत्न केले.
परंतु इच्छुकांची वाढती संख्या व सर्वपक्षीयांनाच सामावून घेताना ही निवडणूक बिनविरोध होणारच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातून दुसरे व तिसरेही पॅनल रिंगणात आल्याने या तीन नेत्यांनी १८ जागांसाठीची केलेली वाटणी निश्चितच होती.
इतर दोन्ही पॅनलने ही निवडणूक चुरशीची करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लक्ष्मीपुत्रांच्या लढाईत दुसऱ्या पॅनलमधील उमेदवार तितकेसे सरस नसल्याने व पॅनलची उभारणी करणाऱ्यांनी फारशी आर्थिक ताकद न लावल्याने त्यांची लढाई लुटुपुटूचीच ठरली.
तिसऱ्या पॅनलमधील उमेदवार तर सामान्य कार्यकर्ते होते. ते या दिग्गज लक्ष्मीपुत्रांशी झुंज देताना हतबल झाले. साहजिकच, काँग्रेस व शिवसेनेच्या पॅनलने सर्व समीकरणे जुळवताना एकहाती सत्ता मिळवत १८ पैकी १६ जागांवर यश संपादन करीत बाजार समितीवर वर्चस्व स्थापित केले आहे. माजी राज्यमंत्री वरपुडकरांसह खा.जाधव व आ डॉ.पाटील हेच तिघे या निवडणुकीचे मुख्य सूत्रधार आहेत.
बातम्या आणखी आहेत...