जालना - काँग्रेस सरकार राज्यात सपशेल अपयशी ठरले असून त्यांनी राज्यातील जनतेला न्याय देण्याचा काहीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी केले. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पदाधिकार्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
‘माझा महाराष्ट्र-भगवा महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हास्तरीय पदाधिकार्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्क नेते शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, आमदार संतोष सांबरे, मोहन अग्रवाल, जि. प. अध्यक्षा आशा भुतेकर, जगन्नाथ काकडे, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्धे, अनिरुद्ध खोतकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मिर्लेकर म्हणाले, या अभियानाच्या माध्यमातून शिवसैनिकांनी मतदार नाव नोंदणी, शिवबंधन मेळावे, नवीन शाखा, मेळावे, सभा या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवला पाहिजे. याप्रसंगी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही क्रांती करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे.
राज्यात शिवशाहीचे सरकार आणावे हीच खरी शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली ठरेल, असे खोतकर याप्रसंगी म्हणाले. याप्रसंगी उपनेते लक्ष्मण वडले यांनीही काँग्रेस सरकारवर टीका केली. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुतेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी शिवसेना पदाधिकार्यांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
फोटो - जि.प.अध्यक्षा आशा भुतेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन करताना रवींद्र मिर्लेकर, अर्जुनराव खोतकर, लक्ष्मण वडले, संतोष सांबरे, शिवाजी चोथे, भास्कर अंबेकर, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, अॅड.भास्कर मगरे, विष्णू पाचफुले, बाबू पवार आदी.