आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये सलग चौथ्या दिवशी पाऊस, मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे मराठवाड्याला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण तयार झाले. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. त्याबरोबर या पावसामुळे येत्या पंधरा दिवसांमध्ये चारा उगवण होणार असल्यामुळे चाऱ्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. दरम्यान, रविवारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी, मंगळवारनंतर बुधवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दिवसभर अधून-मधून हलक्या ते मध्यम सरी कोसळत राहिल्या. हा पाऊस पिकांसाठी अत्यंत पोषक आहे. भिजपावसामुळे जमिनीत ओल वाढत आहे.  

जिल्ह्यात रविवार, सोमवारनंतर मंगळवारीही पाऊस झाला. बुधवारी सकाळीही सूर्यदर्शन झाले नाही. त्यातच प्रशासनाला अतिवृष्टीचा इशारा मिळाला असून २४ तासांत मोठा पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १४.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी (मिलिमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे :  लातूर- ६.३८,  औसा- ६.४४, रेणापूर- १२.५०, उदगीर २०, अहमदपूर ७.६७, चाकूर १२.४०, जळकोट ५.००, निलंगा-१३.२५,  देवणी ३८.३३,  शिरूर अनंतपाळ २५.३३ मिलिमीटर अशी पावसाची नोंद झाली आहे.  सर्वात जास्त पाऊस देवणी तालुक्यात तर सर्वात कमी पाऊस जळकोट तालुक्यात झाला आहे.

बीड : सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला
बीड- जिल्ह्यात सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली असून खरीप पिकांना जीवदान मिळू लागले आहे.  बुधवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने रस्ते जलमय झाले. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत १९ जुलैपर्यंत ९२.१३ मिमी पाऊस झाला असून  वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३१.३५ मिमी पाऊस पडला आहे.  

जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या उरकल्या. त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली. परिणामी खरीप पिकांची वाढच खुंटली होती. जिल्ह्यातील काही तालुक्यांत दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता होती. परंतु सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारीही जिल्ह्यात पाऊस झाला. बीड शहरात  बुधवारी  दुपारी १२ वाजता पावसाला सुरुवात झाली. पंधरा मिनिटे पाऊस झाल्यानंतर काही वेळ ऊन पडले होते.  परंतु पुन्हा काही वेळाने वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बीड शहरातील सुभाष रोड, सहयोगनगर, माळीवेस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साठे चौक  परिसरात रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. पावसामुळे बाजरी, सोयाबीन,  कापूस, मूग, उडीद या पिकांना जीवदान मिळाले आहे.  

आतापर्यंत ९२ मिमी पाऊस  
जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत १९ जुलैपर्यंत ९२.१३ मिमी पाऊस झाला. वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३१.३५ मिमी पाऊस बरसला आहे. मंगळवारी १०.१० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. मंगळवारी आष्टी वगळता सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अंबाजोगाईत सर्वाधिक २०.५७ मिमी एवढा पाऊस झाला, तर पाटोदा व माजलगावात सर्वात कमी ५ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली.

नांदेड : २४ तासांत सरासरी ७.४६ मिमी पाऊस
नांदेड- जिल्ह्यात बुधवार, १९ जुलै रोजी  सकाळी ८ वा. संपलेल्या २४ तासांत सरासरी ७.४६ मिलिमीटर  पावसाची  नोंद  झाली  अाहे.  जिल्‍ह्यात  दिवसभरात एकूण ११९.३४  मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २४९.३५ मिमी पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६.१० टक्के एवढा पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १९ जुलै रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या मागील २४ तासांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये  तालुकानिहाय पुढीलप्रमाणे,  कंसात  एकूण  पाऊस : नांदेड- ५.०० (३९०.३०), मुदखेड- ६.०० (३१३.४९), अर्धापूर- ३.०० (२३८.३३), भोकर- ८.७५ (२७९.७५), उमरी- ५.०० (२२३.९९), कंधार- २.३३ (२६०), लोहा- ११.५० (२३०.९९), किनवट- १५.८६ (२९४.७३), माहूर- २४.०० (२७८.१४), हदगाव- ८.२९ (२७८.७५), हिमायतनगर-९.३३ (१७६.१४), देगलूर- १.६७ (१५९.६५), बिलोली- ७ (२२५.४०), धर्माबाद- ४.६७ (२२७.३५), नायगाव- ४.८० (२००.०६), मुखेड- २.१४ (२१२.५७). आजअखेर  पावसाची सरासरी २४९.३५ (चालू वर्षाचा एकूण पाऊस ३९८९.६४) मिलिमीटर आहे.
बातम्या आणखी आहेत...