आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटग्रस्त वनौषधींचे जतन, संशोधनाची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - भारत हा जैवविविधतेसाठी संपन्नतेचे आगर असून संकटग्रस्त वनस्पतीचे जतन करणे ही काळाची गरज बनली आहे. ऊतीसंवर्धन व जर्म प्लाजमाच्या माध्यमातून हे काम शक्य असून यासाठी भारत व कोरियन सरकारच्या सहकार्याने भारतात प्रयोगशाळा उभारणे गरजेचे असल्याचे मत सेऊलच्या कोनकुक विद्यापीठाचे वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. सीवान पार्क यांनी दै. दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केले.

नांदेड येथील स्वाराती मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञानावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी डॉ. पार्क आले होते. ते म्हणाले आरोग्यासाठी वरदान ठरलेल्या अनेक वनस्पती भारतात आहेत. योग्य संशोधनाअभावी यातील बºयाच वनस्पतींचे महत्त्व व उपयुक्तता अजूनही भारतीयांना ज्ञात नाही. विकास व उत्पन्नाच्या नावाखाली होणारी जंगलतोड व वसाहतींसाठी नष्ट केली जाणारी वनसंपदा यामुळे येथील वनस्पती जगत संकटात सापडले आहे.
आजघडीस 1500 औषधी वनस्पती संकटात आहेत. असे असताना त्याचे संगोपन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. कोरियात संशोधनाला प्राधान्य असून हे काम करणाºया व्यक्तीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहते. ग्रंथालये, प्रयोगशाळा उभारल्या जातात व यात उमलत्या पिढ्या जगाच्या कल्याणासाठी संशोधन करतात. भारतासारखी नैसर्गिक अनुकूलता जगाच्या पाठीवर अभावानेच आढळते. तथापि, मानवी हस्तक्षेपामुळे तिचा होत असलेला गैरवापरही इथेच दिसेल. संशोधनाने असाध्यही साध्य होऊ शकते त्यामुळे संशोधनातील समृद्धी या देशाने वाढवायला हवी. कोरियन सरकारकडे संशोधनासाठी भरीव निधी आहे. ज्ञान व तंत्रज्ञान देवाणघेवाणीच्या माध्यमातून त्याचा लाभ उभय देशांना होऊ शकतो. लातूर जिल्ह्यातील वडवळच्या वनस्पती बेटाबद्दल मी कोरियात ऐकले आहे. दुसºया भेटीत मी त्या टेकडीवर जाणार आहे. वनौषधीची संपन्नता असलेली ही स्थळे शासनाने आरक्षित करून तिथे संशोधन केंद्र उभारावीत. असे घडल्यास मानवी आरोग्यासाठी नवे पर्व या देशातून सुरू होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
व्हाइट पॉयझन : साखर, मीठ व तांदूळ असे पांढरे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात. अशा पदार्थांना कोरियन व्हाइट पॉयझन म्हणतात. म्हणून याचे सेवन टाळण्याकडे त्यांचा कल असतो.
डॉ. पार्क यांचे कार्य : दक्षिण कोरियातील सेऊल येथील कोनकुक विद्यापीठातील ज्येष्ठ वनस्पती अभ्यासक तथा शास्त्रज्ञ. 22 वर्षांपासून संशोधन चार पुस्तके प्रकाशित. आंतरराष्ट्रीय जर्नल व परिषदांतून 400 शोधनिबंध सादर. सध्या मानवी आरोग्यासाठी अन्न व वनस्पतींचा अधिक उपयोग यावर संशोधन सुरू.

महाराष्ट्रात दोन तर भारतात 35 प्रयोगशाळा
भारतात वनौषधीवर संशोधन करणाºया सुमारे 35 प्रयोगशाळा असून महाराष्ट्रात मुंबई व पुण्याला प्रत्येकी एक प्रयोगशाळा आहे. बॉटनिकल सर्व्हे आॅफ इंडिया संशोधनाकरिता केवळ दहा ते 15 लाखांपर्यंत निधी देते. तो निधीही विद्यापीठ किवा महाविद्यालयाला मिळतो. केवळ स्टेशनरी व जुजबी साधनांच्या खरेदीतच तो निधी संपतो. त्यामुळे संशोधनाला खीळ बसते, असे वनस्पती अभ्यासक डॉ. शिवराज निळे यांनी सांगितले.
बेटावर 28 वनौषधी
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात वडवळ (नागनाथ) या गावाजवळ संजीवनी बेट नावाची टेकडी आहे. लाल माती व खडकापासून तयार झालेल्या या टेकडीवर शेकडो वनौषधी आढळतात. तेथील मातीत मँगनीज, फॉस्फेटचे अधिक प्रमाण असल्याने वनस्पतीत औषधी गुणवत्तेची मात्रा अधिक असते. उत्तरा नक्षत्रात वनस्पतीची वाढ गतीने होते व औषधी गुणधर्मही तिच्यात जमा होतात. त्यामुळे या बेटावर या नक्षत्रात व्याधींनी ग्रस्त असलेले शेकडो लोक वनस्पती खाण्यासाठी येतात. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाने केलेल्या पाहणीत या टेकडीवर 28 वनौषधी आढळल्या आहेत.
संकटग्रस्त वनौषधी : करवी, शिवाला, रानवांगे, रानतीळ, कनवेल, खापरखोडा, सफेद मुसळी, काळी मुसळी, कटेरी, जकरा.
आयुर्मान घटण्याची कारणे
*शरीरासाठी लागणारे आवश्यक तेवढे घटक असलेले धान्य व फळे कोरियन माणसे खातात अन् नियमित व्यायामही करतात. अशा धान्य व फळाच्या काही जाती येथील संशोधकांनी विकसित केल्या आहेत.
विकसित केलेल्या धान्य व फळांचीच लागवड केली जाते. उदा: बटाट्यात शर्करेचे प्रमाण अधिक असते त्यामुळे त्याचे जसेच्या तसे सेवन करणे मधुमेहींसाठी धोकादायक असते; परंतु शर्करेचे अत्यल्प प्रमाण असलेल्या बटाट्याची जात कोरियाने विकसित केली आहे.
* अन्न बनवताना आरोग्यासाठी उपकारक ठरेल एवढेच त्या पदार्थाचे प्रमाण घेतले जाते. सर्वच अन्नाबाबत हा नियम काटेकोरपणे पाळला जात असल्याने कोरियन माणसाचे आयुर्मान टिकून आहे. भारतात याउलट परिस्थिती असल्याने आयुष्य घटत आहे.