आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Continues Efforts Needed For Development Of Tribles

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदिवासींच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज, राज्यपालांचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किनवट तालुक्यातील जवरला गावाला शुक्रवारी राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी भेट दिली. त्या वेळी आदिवासींनी परंपरागत ढेमसा नृत्य करून त्यांचे स्वागत केले. छाया : विजय होकर्णे, नांदेड - Divya Marathi
किनवट तालुक्यातील जवरला गावाला शुक्रवारी राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी भेट दिली. त्या वेळी आदिवासींनी परंपरागत ढेमसा नृत्य करून त्यांचे स्वागत केले. छाया : विजय होकर्णे, नांदेड
नांदेड - आदिवासी बांंधवांच्या विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याकरिता सर्व यंत्रणा प्रयत्नशील राहतील. आदिवासी बांधवांसाठी पेसा कायदा १९९८ मध्ये तयार झाला. मात्र, कायद्याचे नियम तयार होण्यास खूप कालावधी गेला. आता नियम तयार झाले आहेत. त्यामुळे या कायद्यान्वये आदिवासींना अधिसूचित क्षेत्रातील विविध बाबींचे हक्क प्राप्त झाले आहेत, अशी माहिती राज्यपाल विद्यासागर राव यांनी शुक्रवारी किनवट तालुक्यातील जवरला या गावी दिली.

राज्यपालांनी दुपारी जवरला गावाला भेट दिली. या वेळी किनवट व माहूर तालुक्यातील पाच गावांना पेसा कायद्याअंतर्गत रीतसर अधिसूचित करणारी अधिसूचना त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. विविध योजनांतील लाभार्थींना योजनेशी संबंधित लाभ प्रदान करण्यात आले.

आपल्या भाषणात राज्यपाल विद्यासागर राव म्हणाले, आदिवासींनी दूध उत्पादन व भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळले पाहिजे. जिल्हा प्रशासनाकडून यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. या परिसरात बारावी विज्ञान शाखेची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या आदिवासी मुलींनी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी संपर्क साधावा. परिचारिका व्यवसायाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. शहरात उत्तम सेवा देऊन परिचारिका चांगले वेतनमान प्राप्त करत आहेत. आदिवासींचे खोटे प्रमाणपत्र मिळवून बिगर आदिवासी शासकीय खात्यातील नोकऱ्या लाटत आहेत. हे सगळे दुर्दैवी प्रकार आहेत. आदिवासी विभाग यासंदर्भात लक्ष घालेल व चौकशी करेल, असे आश्वासनही राज्यपालांनी दिले. आदिवासी नेत्यांनी ब्रिटिश तसेच निझामी राजवटीविरुद्ध तीव्र लढा दिला. या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी आणि सार्वभौमत्वासाठी लढा दिल्याचे ते म्हणाले.

पारंपरिक स्वागत
कार्यक्रमाच्या सुुरुवातीला आदिवासी समाजाच्या परंपरेप्रमाणे माधवराव मरसकोल्हे यांनी मयूरपंखजडित मुकुट घालून राज्यपालांचे स्वागत केले. राज्यपालांच्या हस्ते कोलामपोड, पितांबरवाडी, हटकरखोरी, नागझरी आणि मंगाबोडी या पाच गावांना पेसाअंतर्गत दर्जा प्रदान करण्यात आल्याची अधिसूचना प्रदान करण्यात आली. विकास कुडमेथे नागोराव आत्राम, सीताबाई आत्राम, दत्ता आडे, रुख्माबाई कुमरे व आत्माराम मुंडे, मंगाबोडी येथील अनसूया पेंदोर, मारुती आडे या सरपंचांनी अधिसूचनेचा स्वीकार केला.