आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचा गांधी जयंतीचा स्वच्छता सप्ताह, भाजपचा जेपी पंधरवडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- राज्य आणि केंद्र सरकारने नेहरू आणि गांधी यांच्या नावाने किंवा जयंतीला सुरू असलेल्या उपक्रमांची नावे बदलण्याचाच जणू सपाटा लावला आहे. त्याचा प्रत्यय स्वच्छता सप्ताहाने आला. दरवर्षी महात्मा गांधी जयंती दिनापासून (२ ऑक्टोबर) स्वच्छता सप्ताह साजरा केला जात असे. यंदा मात्र राष्ट्रीय स्वच्छता अभियान पंधरवडा राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकनायक जयप्रकाश नारायण (जेपी) यांच्या जयंतीचा उल्लेख करण्यात आला असून समारोपाचा मुहूर्तही त्यांच्या जयंतीला (११ ऑक्टोबर) ठरवण्यात आला आहे.

इंदिरा गांधींच्या प्रशासकीय धोरणाचे विरोधक म्हणून जयप्रकाश नारायण यांना ओळखले जाते. १९७५ मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली त्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्यासह ६०० पेक्षा अधिक जणांना कारागृहात बंद करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना १९९८ मध्ये भारतरत्न देऊन गौरवण्यात आलेले आहे. त्यांची औळख नव्या पिढीलाही व्हावी म्हणून यंदा राज्य शासनाने ११ ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची व्याप्ती वाढवून सप्ताहातून त्याचा कालावधी पंधरवड्यात केला आहे.
यासंदर्भातील राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार यांनी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाला पत्र दिले आहे. यात कार्यक्रमाच्या आखणीतच ‘जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त’ असा उल्लेख करण्यात अाला अाहे. त्यानुसार कार्यक्रमांचे नियाेजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
२००४ पासून सुरू होता उपक्रम
राज्य पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दरवर्षी महात्मा गांधी जयंती दिनापासून (२ ऑक्टोबर) स्वच्छता सप्ताह या नावाने साजरा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या स्वच्छता मिशन विभागाला देण्यात येत. सन २००४ पासून हा सप्ताह गांधी जयंती दिनापासून होत होता. उपक्रम काय घ्यावेत, अशा कोणत्याही सूचना यापूर्वी यंत्रणेला दिल्या जात नव्हत्या. मात्र, यंदा लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय स्वच्छता अभियान’ या नावाने पंधरवडा राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याची सुरुवात पंधरा दिवस आधीपासून करून समारोप जयंतीदिनी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्या दिवशी काेणता कार्यक्रम घ्यावा याची रूपरेषाही शासनाने ठरवून दिली आहे.
यापूर्वी
२ ऑक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन केले जायचे. त्यामधून नळ योजना, पाणीपुरवठा दुरुस्ती, ग्रामीण भागात स्वच्छता कार्यक्रम घेण्यात येत होते.
आता
२५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबरदरम्यान राष्ट्रीय स्वच्छता अभियान पंधरवड्यात बीड जिल्ह्यातील आराखड्यातील निवडलेल्या १०५ गावांमध्ये एकाच वेळी प्रभातफेरी, शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडीत स्वच्छता मोहीम, स्वच्छता मित्र, वक्तृत्व स्पर्धा, ग्रामस्तरीय बैठक, हागणदारीमुक्त गावात उत्सव, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम होणार आहेत.
टोप्या बदलण्याचे काम
- केंद्र सरकारने नियोजन आयोग बंद करून नीती आयोग, पेन्शन योजना बंद करून अटल पेन्शन योजना व शेती खात्याचे नाव बदलून कृषी आणि शेतकरी कल्याण खाते असा बदल केला आहे.
- राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेस (आरजीजीव्हीवाय) दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना (डीडीयूजीजेवाय) असे नाव देण्यात आले.
- ‘निर्मल भारत अभियान’ऐवजी ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) असे नवे नाव देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या सूचनेनुसार कार्यक्रम
यंदा प्रथमच पंधरवड्याच्या माध्यमातून जागृती करण्यात येत असून वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामावर भर देण्यात येत आहे. शासनाच्या सूचनेनुसार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
मधुकर वासणे,
उपमुख्य कार्यकारी, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, बीड