आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी नगरसेवकाचा संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना / औरंगाबाद - माजी नगरसेवक कैलास गौड (50) यांचा संशयास्पद मृत्यू झाला. शनिवारी सकाळी 7 वाजता जुना मोंढा भागातील कॉम्प्लेक्समध्ये ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत गौड घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. सकाळी जुना मोंढ्यातील कॉम्प्लेक्सजवळ त्यांची दुचाकी आढळली. मोबाइलद्वारे त्यांना संपर्क केला असता त्यांचा मोबाइल खणखणला.

आवाजाच्या दिशेने शोध घेताना कॉम्प्लेक्सच्या प्रस्तावित लिफ्टच्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. मुलाचा खून करण्यात आला असून दोषींना अटक करा, अशी मागणी आई कमलबाई गौड यांनी केली. 10 वाजेच्या सुमारास पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सुरुवातीला सामान्य रुग्णालयात पाठवला. मात्र, नातेवाइकांच्या मागणीवरून पोलिसांनी औरंगाबाद घाटी रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठवण्यात आला.

कुटुंबीयांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली. घाटीत दुपारी चार वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी इनकॅमेरा उत्तरीय तपासणी केली. सहायक पोलिस आयुक्त के. एस. बहुरे, पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांच्यासह सुमारे शंभर पोलिस तैनात करण्यात आले होते. गौड यांचे नातेवाईक परराज्यातून येणार असल्याने मृतदेह घाटीतील शीतगृहात ठेवण्यात आला आहे. रविवारी दुपारी अंत्यसंस्कार होतील.