आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकीच्या अब्रूसाठी पतीचा कु-हाडीने खून; पत्नी निर्दोष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - लेकीची अब्रू वाचवण्यासाठी पतीचा कु-हाडीने खून करणा-या पत्नीला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी दोषी न ठरवता भारतीय दंड विधानाच्या कलम १०० मधील तरतुदीनुसार गुरुवारी निर्दोष मुक्त केले आहे.

केज तालुक्यातील टाकळी येथील विनायक बारगजे यांच्या लहान मुलीचे १९ ऑगस्ट २०१३ रोजी लग्न झाले. या कार्यासाठी त्यांची मोठी मुलगी टाकळी येथे आली होती. आईने आग्रह केल्याने मोठी मुलगी गावी राहिली. २१ ऑगस्ट रोजी विनायक दारू पिऊन घरीआला. दारूच्या नशेत त्याने पत्नी काशीबाईला शिवीगाळ व मारहाण सुरू केली. दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू असताना त्याने मोठ्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहताच बेभान झालेल्या काशीबाईंनी वैरण कापण्याची कु-हाड हाती घेत विनायकच्या पाठीवर वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात काशीबाई बारगजे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी या प्रकरणात तपास करून अंबाजोगाई येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, आरोपी काशीबाई यांचे वकील विक्रम खंदारे यांनी उलटतपासणी करत असताना मूळ मुद्द्यावर उलट तपासणी केली नाही. सबब खुनाचा मुद्दा कबूल केला. त्यात काशीबाईला बचावाचा साक्षीदार म्हणून तपासण्यात आले.

विशिष्ट परिस्थितीत खून : काशीबाईने स्वत:च्या मुलीला पतीच्या तावडीतून वाचवण्यासाठी विशिष्ट परिस्थितीत पतीचा खून केला. भारतीय दंड विधान कलम १०० मधील तरतुदीनुसार तिची निर्दोष मुक्तता केली असल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. तेलगावकर यांनी दिला. या प्रकरणात महिलेच्या वतीने अॅड. विक्रम खंदारे, अॅड. विलास तांदळे, अॅड. विकास कांबळे यांनी काम पाहिले.

...ते दृश्य पाहताच बेभान झाले : पती विनायक स्वत:च्याच मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात होता. ते दृश्य पाहून माझ्या मनाचा तोल ढासळला. मुलीला पतीच्या तावडीतून सोडवण्याचे खूप प्रयत्न केला; परंतु तो सोडत नसल्याने कु-हाडीने वार करून त्याचा खून केल्याचा जबाब या प्रकरणातील आरोपी काशीबाई बारगजे यांनी नोंदवला.

दोन प्रकरणांचा संदर्भ
बलात्कारापासून वाचवण्यासाठी खून केला असेल तर भादंवि कलम १०० मधील तरतुदीनुसार निर्दाेष मुक्तता होते. आम्ही काशीबाईंचा संपूर्ण जबाब मांडला. तसेच हिमाचल प्रदेश व राजस्थानच्या प्रकरणांचे संदर्भ दिले. त्यावरून न्यायालयाने हा निकाल दिला.
अॅड. विक्रम खंदारे, अंबाजोगाई