आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरे यांच्याविरुद्ध न्यायालयाचे पकड वॉरंट, समन्‍स देऊनसुध्‍दा न्‍यायालयात गैरहजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - सहा वर्षांपूर्वी अंबाजोगाईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केल्याने अंबाजोगाई पोलिस ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा नोंद झाला होता. जामीन घेतल्यानंतरही न्यायालयाच्या कामकाजासाठी राज ठाकरे हे सतत गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरुद्ध अंबाजोगाई येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुरणे यांनी पकड वॉरंट जारी केले आहे.  
 
अंबाजोगाई येथे २०११-१२ मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शहरात राडा करून वाहनांची तोडफोड केली होती. तत्कालीन शहर ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांच्यावरही गुन्हा दाखल केला होता. येथील  तत्कालीन प्रथमवर्ग न्यायाधीश बुके यांनी राज ठाकरे यांची जामिनावर मुक्तता  करत त्यांचा हजरी माफीचा अर्ज मंजूर केला होता. या प्रकरणाची सुनावणी  येथील न्यायालयात सुरू झाल्याने ठाकरे यांना  न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, समन्स देऊनसुद्धा अंबाजोगाई न्यायालयात  ते हजर राहत नसल्याने त्यांच्यावर प्रथमवर्ग  न्यायदंडाधिकारी  अनिता कुरणे यांनी पकड वॉरंट जारी केले आहे. प्रकरणाची पुढील  तारीख  १ एप्रिल २०१७ ठेवण्यात आली असून अंबाजोगाई पोलिस राज ठाकरेंना पकडून आणणार की नाही, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

काय होते प्रकरण?   
अंबाजोगाईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक करत शासकीय मालमत्तेचे नुकसान केले होते. याप्रकरणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे सुनील जगताप, दुष्यंत लोमटे, दत्ता कदम यांच्यासह दहा जणांविरुद्ध  येथील शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हे प्रकरण सुनावणीसाठी येथील  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अनिता कुरणे यांच्या न्यायालयासमोर आले आहे.  
बातम्या आणखी आहेत...