आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातुरात तरुणावर तलवारीने हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - औसा रोडवर असलेल्या नंदी स्टॉप या मध्यवर्ती ठिकाणी सोमवारी सकाळी काही तरुणांनी एकाला मारझोड करीत त्याच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला. तो गंभीर असून त्याच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भररस्त्यात वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराजवळील वासनगाव येथील आकाश पाटील व मंगेश लोभे हे चांडेश्वर येथील स्वप्निल जाधवचे मित्र होते. तथापि त्यांची शनिवारी एका प्रकरणावरून स्वप्निलशी कुरबुर झाली होती. स्वप्निलला त्यांनी मारझोडही केली होती. परंतु फ्रेंडशिप डे दिवशी त्यांनी हे प्रकरण मिटवून पुन्हा मैत्री करण्याचे ठरवले होते. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास स्वप्निल व मंगेश हे नंदी स्टॉपवरील एका हॉटेलात त्याच्या मित्रांसमवेत चहा घेत बसले होते. त्यावेळी आकाश व अन्य अनोळखी सहाजण कारमधून तेथे आले. त्यांनी स्वप्निलला शिव्या घालत त्याला मारझोड करण्यास सुरुवात केली. या वेळी मंगेशही तत्काळ उठला व त्याने कारमधील तलवार काढून तिच्या मुठीने स्वप्निलच्या डोक्यात घाव घातला. यामुळे स्वप्निल बेशुद्ध पडला व हल्लेखोर पसार झाले. तेथे असलेल्या नागरिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डी. डी. शिंदे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तथापि आरोपी पसार झाले होते. या घटनेची गंभीरपणे दखल घेत पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधार्थ दोन पोलिस पथके रवाना केली. सायंकाळी या प्रकरणाशी संबंधित काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बातम्या आणखी आहेत...