आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूकदारांचे पुरावे परत घेण्याचा डाव, समृद्ध जीवन कंपनीची खेळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या समृद्ध जीवन फुड्स इंडिया या कंपनीवर सेबीने बंदी घातली आहे. गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कंपनी गुंतवणुकीचे सर्व पुरावे, कागदपत्रे गुंतवणूकदारांकडून काढून घेत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना न्यायालयात जाता येणार नाही. कंपनीने मुदतीत पैसे परत न केल्यास जोरदार आंदोलन केले जाईल, असा इशारा संभाजी सेनेचे केंद्रीय अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिला आहे.
आंदोलनासंदर्भात माहिती देण्यासाठी सेनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली, यामध्ये माने बोलत होते. याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष बाजीराव देशमुख यांची उपस्थिती होती.
माने म्हणाले की, दुप्पट, तिप्पट रक्कम देण्याचे अामिष दाखवून कंपनीने ६०० कोटींहून अधिक रक्कम उकळली आहे. या कंपनीचे सर्व व्यवहार लबाडीचे आहेत, ही बाब निदर्शनास आल्यामुळे दि. २ सप्टेंबरला सेक्युरिटीज् अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) कंपनीवर बंदी घातली आहे. तीन महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांची रक्कम देण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, हे आदेश कंपनी धुडकावून लावत आहे. गुंतवणूकदारांना उर्मट उत्तरे देणे, वारंवार हेलपाटे मारायला लावणे, पैसे देण्यास टाळणे असे प्रकार होत आहेत. काही ठिकाणी गुंतवणुकीचे सर्व मूळ कागदपत्रे व पुरावे जमा करण्यास सांगण्यात येत आहे. याच्या बदल्यात कंपनी समृद्ध जीवन मल्टिस्टेट मल्टिपर्पजची पोहोच देत आहे. गुंतवणूकदारांना न्यायालयात दाद मागता येऊ नये म्हणून कागदपत्रे काढून घेतली जात आहेत. यामुळे कंपनीच्या कार्यालयांवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे, असेही माने यांनी सांगितले.
जिल्ह्याचे ३२ कोटी
समृद्ध जीवन कंपनीमध्ये जिल्ह्यातील २७ हजार गुंतवणूकदारांनी ३२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, अशीही माहिती माने यांनी दिली. ते म्हणाले की, १४ हजार जनावरे आता कंपनीकडे आहेत. यातून ६०० कोटी रुपये ते कसे देणार हा प्रश्न आहे. कोणत्याही प्रकल्पात शेळ्यांची संख्या
मोजकीच आहे.

तर सर्वत्र आंदोलन
समृद्ध जीवन फुड्स इंडियाशी आपला काहीही संबंध नाही, असे महेश मोतेवार सांगत आहे. मात्र, सेबीच्या सुनावणीत मोतेवार संचालक असल्याचे सिद्ध झाले आहे. मोतेवार यांची नियत चांगली नाही, यामुळे त्यांना व संचालकांना अटक करण्यात यावी. अन्यथा, संचालक देश सोडून जातील. नंतर काहीही करता येणार नाही. यासंदर्भात योग्य कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माने यांनी दिला.