आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरणाचा प्रयत्न करणारा अटकेत, औरंगाबादेतील व्यंकटी मालेगावेची करामत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- शाळेत जाण्यासाठी बसने ये-जा करणाऱ्या मुलींना जबरदस्ती कारमध्ये डांबून अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या व्यंकटी पिराजी मालेगावे (गुरुदत्तनगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद) याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहाच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील चामणी पाटीवर हा प्रकार घडला.

चामणी येथील पाच मुली जिंतूर शहरातील ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षण घेतात. या मुली सकाळी सहा वाजता घरून निघून चामणी पाटीवर येऊन थांबल्या. बसची वाट पाहत उभ्या असताना जिंतूरकडून येणारी मारुती कार त्यांच्याजवळ थांबली. या गाडीतील व्यक्तीने तुम्हाला कोठे जायचे आहे? अशी चौकशी करून मुलींना गाडीत बसण्याचे सांगितले. परंतु मुलींनी गाडीत बसण्यासाठी नकार दिल्याने ती व्यक्ती गाडीतून खाली उतरली व ती एका मुलीस जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करू लागली. या वेळी इतर मुलींनी आरडाओरडा सुरू केला. या वेळी लिंबाळा येथील पत्रकार रामप्रसाद कंठाळे मोटरसायकलवरून जिंतूरकडे जात होते. त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी चामणी ग्रामस्थांना मोबाइलवरून माहिती देत त्या व्यक्तीस अडवून ठेवले. ग्रामस्थांनी चामणी पाटीवर धाव घेऊन त्या व्यक्तीस पोलिसांच्या स्वाधीन केले. व्यंकटी मालेगावे असे त्या व्यक्तीचे नाव आहे.