आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी दगडफेक, मग पेटवल्या झोपड्या; आता राहायचे कुठे अन‌् खायचे काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रोजच्या सारखीच सकाळी अकराच्या दरम्यान घरकामात व्यग्र असताना अचानक घरावर धडाधड दगडांचा वर्षाव झाला. नातसुनेने घरावर काही लोकांनी हल्ला केल्याचे सांगेपर्यंतच आमच्या झोपड्यांना आगही लागली. जीव वाचवून बाहेर पळालो, काही वाचवायला वेळच कुठे मिळाला? अख्ख्या घराचा डोळ्यांदेखत कोळसा झाला. आता फक्त अंगावरचेच कपडे शिल्लक राहिलेत. आता खायचे काय आणि राहायचे कुठे? हाच प्रश्न आहे. हे सांगताना ७० वर्षीय कौसाबाई विश्वनाथ गांगुर्डे यांनी डोळ्यांतील आसवांना वाट मोकळी करून दिली. डोळ्यातून खाली पडलेल्या पाण्याचा आगीचे निखारे विझवायला हातभार लागला.

पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा गावात अनेक वर्षांपासून भिल्ल समाजाची घरे आहेत. काही गावात राहतात, तर काही गावाबाहेर. याच समाजातील बबन गांगुर्डे यांच्याकडे आलेल्या मेहुणा सुनील बर्डे याने पारगावातील मीरा सुग्रीव घुमरे या महिलेचा खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशयही व्यक्त करण्यात आला. बुधवारी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर जमाव अाक्रमक झाला आणि थेट तीन वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या भिल्ल समाजाच्या घरांवर चालून गेला. सुरुवातीला घरांवर दगडफेक आणि नंतर तिन्ही ठिकाणची घरे, झोपड्या पेटवून देण्यात आल्या.

कौसाबाई म्हणाल्या, मुलगा जगन्नाथ सुनेसह मजुरीला, तर नातू ऊसतोडणीला गेलेले. घरी मी आणि नातसूनच. आगीच्या कचाट्यातून काही सामान वाचवायला वेळच मिळाला नाही. पोलिस आले तेव्हा त्यांनी आग विझवली, आता ना राहायला घर आहे, ना खायला अन्न, ना कपडे या घटनेमुळे अनेक समस्यांची नवी "धग' आमच्या मनात आहे. हे सांगताना जळालेल्या घरात काही शिल्लक राहिलंय का, हे त्या पाहत होत्या.

अधिकारी तळ ठोकून : घटनेचे गांभीर्य ओळखून पारगाव घुमरा येथे बुधवारी दुपारी पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आष्टीचे पोलिस उपअधीक्षक डाॅ. अभिजित पाटील, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार गणेश जाधव आदी दिवसभर पारगावमध्ये तळ ठाकून होते.
सरपंचही भिल्लच
विशेष बाब म्हणजे पारगावमध्ये पहिल्यांदाच एसटी प्रवर्गातील महिलेसाठी सरपंचपद आरक्षित झाल्याने भिल्ल समाजाच्या तारामती तुकाराम गांगुर्डे या सरपंच आहेत. असे असतानाही हा प्रकार झाला. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर अाली.
परिस्थिती नियंत्रणात
सध्या परिस्थिती नियंत्रणात असून भिल्ल समाजाच्या लोकांशीही मी बोललो. काही नतद्रष्टांनी हा प्रकार केला आहे. यापूर्वी असा प्रकार झाला नाही. सध्या गावात शांतता अाहे. कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.’’
अनिल पारसकर, पोलिस अधीक्षक

गावात दुकाने बंद
घटनेनंतर पाटोदा पोलिस, शिरूर पोलिस, राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक असा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला होता. गावात तणावपूर्ण शांतता अाहे. सर्व दुकाने बंद असल्याने अघोषित बंदसारखी स्थिती गावात असून नागरिक किंवा इतर कुणीही याप्रकरणी बोलायला तयार नाही.

यांची जळाली घरे
पारगाव घुमरा येथील भिल्ल समाजातील भानुदास शंकर माळी, शंकर सदाशिव गांगुर्डे, गंगाराम नाना गांगुर्डे, प्रल्हाद शंकर गांगुर्डे, सुमन मुरलीधर गांगुर्डे (बर्डे), लता मुरलीधर ऊर्फ लता भाऊ बर्डे, बबन मुरलीधर गांगुर्डे, जयवंता गांगुर्डे, दिगंबर माळी, मोहन गांगुर्डे, जीवन गांगुर्डे यांच्यासह इतरही काही जणांची घरे जाळण्यात आली आहेत. दुपारी तलाठी बी. जे. नागरगोजे, मंडळ अधिकारी एस. बी. उंडाळे यांनी घरांचा पंचनामा केला.