आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी वकिलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - न्यायालयीन प्रकरणात शिक्षा होऊ नये, यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना आष्टी येथील सरकारी वकील शेख मोहंमद असलम रहेमशामियाँ यांना बुधवारी दुपारी दीड वाजता बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
आष्टीचे चरणसिंग हरिसिंग बावरे यांनी 18 जानेवारी 2008 रोजी ग्रामविकास अधिकारी लोंढे यांच्याकडे आठ अ चा उतारा मागितला होता. लोंढे व बावरे यांच्यात बाचाबाची झाली. लोंढे यांनी आष्टी ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. 2009 मध्ये न्यायालयात दोषाारोपपत्र दाखल होऊन सुनावणी सुरू झाली. प्रकरण अंतिम टप्प्यात असताना तीन एप्रिल रोजी आष्टी न्यायालयात तारखेसाठी आलेले बावरे यांना सरकारी वकील शेख मोहंमद यांनी कार्यालयात बोलावून घेतले. बावरे यांना स्वत:च्या कार्यालयात बोलावल्यानंतर सरकारी वकील शेख यांनी बावरे यांना या प्रकरणातील पुरावे तुमच्याविरुद्ध असून शिक्षा होण्याची शक्यता आहे, असे सांगितले. मदतीसाठी पाच हजारांची मागणी केली. पुढच्या तारखेला सुनावणी आहे. तुम्हाला शिक्षा झाल्यास मला दोष देऊ नका, असे शेख यांनी सांगितले. तेव्हा बावरे यांनी तीन हजार रुपये दिले.
उर्वरित दोन हजार रुपये पुढच्या तारखेला देण्याचे ठरले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
असे अडकले जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या सहकार्‍यांनी बुधवारी दुपारी एक वाजता आष्टी न्यायालयात सापळा लावला. बावरे यांच्याकडून दोन हजारांची लाच घेताना शेख यांना रंगेहाथ पकडले. छातीत दुखू लागल्याने अस्लम शेख यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले.