आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत भरदिवसा चोरी : दहा लाखांची बॅग लांबवली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शहराच्या मध्यवस्तीत सराफा बाजारपेठेतील व्यापार्‍याच्या दुचाकीच्या डिकीतील सोन्याचे दागिने व दीड लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग चोरट्याने सोमवारी (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास लांबवल्याने बाजारपेठेत खळबळ उडाली. अत्यंत गर्दीचे ठिकाण असलेल्या कोमटी गल्लीतील सराफा लेनमधून चोरट्याने शिताफीने ही चोरी केली.

अमेयनगर भागातील रहिवासी राजेश ध्रुवप्रसाद अग्रवाल यांचे अग्रवाल ज्वेलर्स या नावाने कोमटी गल्लीत दुकान आहे. हा भाग मध्यवर्ती असून संपूर्ण दुकाने सोन्या-चांदीचीच आहेत. अग्रवाल सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास अँक्टिव्हा मोटारसायकलवरून (एमएच 22 के 2266) कोमटी गल्ली येथे पोहोचले. रविवारी रात्री जाताना दुकानातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने त्यांनी घरी नेले होते. पैशाची व दागिन्यांची बॅग त्यांनी अँक्टिव्हाच्या डिकीमध्ये ठेवली होती. दुकानाच्या समोरच्या बाजूस त्यांनी गाडी पार्क करून दुकान उघडून साफसफाई केली. त्यानंतर ते बॅग घेण्यासाठी गाडीजवळ गेले असता डिकीतून ती बॅग गायब असल्याचे निदर्शनास आले. अवघ्या काही मिनिटांतच चोरट्याने ती बॅग लांबवली.

चोरीस गेलेल्या ऐवजाबाबत संभ्रम
व्यापारी अग्रवाल यांनी याप्रकरणी नानलपेठ पोलिसांत तक्रार अर्ज दिला आहे. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल केलेला नव्हता. पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार यात नेमके किती तोळे सोने तक्रारीत नमूद करायचे, याबाबत व्यापारी अग्रवाल हेच संभ्रमात होते. यातून काही विम्याचा वगैरे प्रकार आहे का, याचीही चाचपणी पोलिस करीत होते.

आठवड्यात दुसरी घटना..
पाळत ठेवून बॅग चोरीचे प्रकार परभणीत वाढत आहे. चारच दिवसांपूर्वी कृषी विद्यापीठ परिसरात 19 लाखांची बॅग चोरट्यांनी चाकूहल्ला करून लांबवली होती. कारचा पाठलाग करूनच तो प्रकार झाला होता. त्या प्रकाराचा पोलिसांना कोणताही सुगावा लागलेले नसताना सोमवारचा हा प्रकार घडल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.