आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापुतारा येथे वैजापूरच्या महिलेचा संशयास्पद मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा / वैजापूर - वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील नवविवाहितेचा मृतदेह सापुताराजवळील सुरगाणा हद्दीत (जि. नाशिक) आढळला. पतीसमवेत पर्यटनास आली असताना टेबल पॉइंटवरील कड्यावरून पाय घसरून तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत महिलेल्या नातेवाइकांनी तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केल्याने पतीस अटक करण्यात आली आहे.

याबाबत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वैजापूर येथील आलिया वासिफ शेख (19) ही महिला पती वासिफ मुसा शेख (30) यांच्यासमवेत पर्यटनास आली होती. दोघेही उंच असलेल्या टेबल पॉइंटवर फिरावयास गेले असता सायंकाळी पाचच्या सुमारास आलिया कड्यावरून खोल दरीत पाय घसरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना सुरगाणा पोलिसांच्या हद्दीत असल्याने पोलिसांनी वासिफ शेख यास अटक केली आहे. तिचे माहेर श्रीरामपूर येथील असून 9 फेब्रुवारी रोजी श्रीरामपूर येथे तिचा विवाह वैजापूर येथील वासिफ शेख याच्याशी झाला होता.

वासिफ सौदी अरेबियामध्ये एसी तंत्रज्ञ म्हणून कामास होता. विवाहानंतर या दोघांमध्ये पंधरा दिवसांपासून कुरबुर सुरू होती. याबाबत वैजापूर येथे जाऊन आलियाच्या नातेवाइकांनी त्याची समजूतही काढली होती.

मात्र, तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असायचा तसेच वैजापूर येथे गाळा विकत घेण्यासाठी पाच लाखांची मागणी करायचा, अशीही माहिती आलियाच्या नातेवाइकांनी दिल्याने घटनेचे गूढ वाढले आहे.