लातूर - निलंगा तालुक्यातील १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने प्रेम
विवाह केला खरा, पण तो अल्पावधीतच मोडला. परिणामी, प्रेमभंगाच्या दु:खातून तिने चो-या करण्याचा मार्ग निवडला आणि गजाआड झाली.
लातूर ग्रामीण पोलिसांनी चार दिवसांपूर्वी दिवसा घरफोड्या करणारी चार जणांची टोळी अटक केली होती. यात अशोक बनसोडे, नितीन बावलगे, बबन शिंदे, अक्षय इकिले या चोरट्यांचा समावेश होता. त्यांच्याकडून सुमारे दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला असून, त्यांनी शहरात सात ठिकाणी चो-या केल्याची कबुली दिली आहे. चौकशी दरम्यान या चोरट्यांनी पोलिसांना सांगितले होते की शहरातील एका चोरीच्या प्रकरणात १६ वर्षांच्या तरुणीचा सहभाग आहे. सध्या ती तरुणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यावरून लातूर पोलिसांनी त्या मुलीला मुंबईतून
चौकशीसाठी आणले. तिने सांगितलेली माहिती थक्क करणारी होती.
घरच्यांनी स्वीकारले नाही
सदर मुलीने प्रेमविवाह केल्यानंतर काही दिवसांतच तो मोडला. त्यामुळे ती परत
आपल्या आई-वडिलांकडे आली, परंतु त्यांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ती लातुरातील प्रकाशनगरात किरायाच्या रूममध्ये राहू लागली. तीन महिन्यांपूवी ती या आरोपींच्या संपर्कात आली. त्यानंतर ती त्यांच्यासमवेत दिवसा घरफोड्या करू लागली.
विद्यार्थिनी असल्याचा बनाव
चोरी करण्यापूर्वी ती अपार्टमेंटमध्ये जाऊन अंदाज घ्यायची. घरमालकांना सांगायची मी इंजिनिअरिंग कॉलेजची विद्यार्थिनी आहे. घर भाड्याने घ्यावयाचे आहे. दिसायला सुंदर व बोलणे चटपटीत असायचे. िशवाय पोशाख मॉडर्न असायचा. घराचा अंदाज घेतल्यानंतर दोन-चार दिवसांत साथीदारांच्या मदतीने त्या घरात चोरी केली जात असे. तिचा लातुरातील एकाच चोरीत सहभाग आहे.
मुंबईत केली चोरी
लातुरातून तिने मुंबईकडे माेर्चा वळवला. तिथं तिचा अन्य एका तरुणाशी संपर्क झाला. त्याच्या मदतीने चो-या करू लागली. जुहू भागात चोरी केल्यांनतर ती तेथील पोलिसांच्या हाती लागली. तेथून लातूर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले व चौकशी करून पुन्हा त्यांच्या ताब्यात देण्यात आले.