लातूर - रेणापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. श्याम पटवारी यांच्यावर गुरुवारी सकाळी सव्वाअकरा वाजता त्यांच्या कार्यालयात खंडणीसाठी हल्ला करण्यात आला. यासंदर्भात रेणापूर पोलिस ठाण्यात 10 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक झाली आहे.
दत्ता व्यंकटी (23) व संतोष शिंदे (24, दोघे रा. समसापूर, ता. रेणापूर) अशी त्या दोघांची नावे आहेत. पटवारी आपल्या कार्यालयात बसले असता संभाजी सेनेचे कार्यकर्ते असल्याचे नाव सांगणारे आठ ते दहा जण तेथे आले. त्यांनी आम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यासाठी निधी म्हणून दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. पटवारी यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी 50 हजार तरी द्यावे म्हणून जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. त्यासही पटवारी यांनी भीक घातली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या शर्टाला धरून झोंबाझोंबी करत त्यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर चाकू घेऊन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर, कार्यालयात शाई फेकून त्यांच्या बोटातील दोन अंगठ्या, गळ्यातील तीन तोळ्यांचे लॉकेट घेऊन पोबारा केला. या हल्ल्यात पटवारी यांच्या हाताच्या बोटांना चाकूचा मारही लागला. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी लातूरचे तहसीलदार महेश शेवाळे यांच्यावरही हल्ला करण्यात आला होता.
हल्लेखोरांचा आला होता फोन :पटवारी यांना बुधवारी रात्री हल्लेखोरांचा फोन आला होता. त्या वेळी त्यांनी त्यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच आम्ही उद्या तुमच्या कार्यालयात येणार असल्याचेही बजावले होते. गुरुवारी सकाळी ते आले आणि गोंधळ घातला, ही माहिती पटवारी यांनीच पत्रकारांना दिली.