पाचोड - बहिणीच्या लग्नानंतर पतीने तातडीने सासरी आणल्याचा राग आल्यामुळे पोटच्या साडेनऊ महिन्यांच्या मुलीला विष पाजून विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पाचोड पोलिसांनी मृत विवाहितेविरुद्ध खुनाचा गुन्हा गुरुवारी (1 मे) नोंदवला आहे.
पैठण तालुक्यातील गावतांडा येथील संगीता बद्रीनाथ गोर्डे (25) हिच्या बहिणीचे घारेगाव येथे गुरुवारी लग्न झाले. लग्नानंतर संगीताचे पती बद्रीनाथ गोर्डेने तिला सासरी (गावतांडा) निघण्यास सांगितले. संगीताला लग्नघरीच थांबायचे होते, परंतु पतीच्या आग्रहामुळे ती पतीसोबत सासरी आली. घरातील व्यक्ती कामात असल्याचे पाहून संगीताने साडेनऊ महिन्यांच्या प्रगतीला विष दिले. त्यानंतर लगेचच संगीताने विष घेतले. संगीताचा पती बद्रीनाथ गोर्डेला ही घटना समजताच त्याने पत्नी तसेच मुलीला तत्काळ बिडकीन ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना 24 एप्रिल रोजी संगीताचा मृत्यू झाला, तर प्रगतीचा 30 एप्रिल रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरकार पक्षातर्फे जमादार काशीनाथ लुटे यांनी संगीता बद्रीनाथ गोर्डेविरुद्ध मुलीला विष पाजून मारल्याप्रकरणी, तर विष पिऊन आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी.जी. चिखलीकर हे करत आहेत.