आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकार्‍यांना चाबकाने मारहाण; परभणी येथील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शासकीय खरेदी केंद्रावरील धान्य खरेदीवरून उद्भवलेल्या वादानंतर शेतकरी संघटना व आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तीन अधिकार्‍यांना चाबकाने मारहाण केली. या प्रकरणी आप व शेतकरी संघटनेच्या 15 ते 20 कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले.

जिंतूर रोडवरील शासकीय खरेदी केंद्रावर तूर व हरभर्‍याची खरेदी सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटना व आपने शेतकर्‍यांना या केंद्रावर धान्य आणण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकरी आले होते. तेथे कर्मचार्‍यांनी धान्य, त्यातील मॉइश्चर व सातबारा आदींची तपासणी सुरू केल्यानंतर नाफेडच्या निकषाप्रमाणेच खरेदी केली जाईल, असे स्पष्ट केले. काही शेतकर्‍यांकडे सातबारा नव्हता, धान्यात अडचणी येत होत्या. शेतकर्‍यांनी निकष न लावता मोजमाप करा, माल उतरवून घ्या, अशी मागणी केली. मात्र, निकषानुसार खरेदी केली जाईल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केल्याने वाद वाढत गेला. जिल्हा उपनिबंधक एस.एस. क्षीरसागर यांनाही तेथे बोलावण्यात आले. परंतु वाद वाढल्याने अधिकार्‍यांना मारहाण करण्यात आली.

कार्यकर्त्यांवर गुन्हे : शेतकरी संघटनेचे अमृत शिंदे, माऊली कदम, गणेश पाटील, महादेव अवचार, बंडू सोळंके, भानुदास शिंदे, आम आदमी पार्टीचे रामराव जाधव, अर्जुन साबळे यांच्यासह अन्य 15 ते 20 कार्यकर्त्यांवर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांना झाली मारहाण
मारहाण झालेल्या अधिकार्‍यांत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (डीडीआर) एस.एस.क्षीरसागर, जिल्हा मार्केटिंग अधिकारी (डीएमओ) आर.बी. चव्हाण व केंद्राचे अधिकारी व्ही.डी. मारमवार यांचा समावेश आहे. मारमवार यांच्या पोटावर, कमरेवर जखमा झाल्या असून क्षीरसागर यांच्या हातास व डोक्यास मार लागला आहे.