आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुनिमावर चाकूहल्ला करून 19 लाखांची लूट, परभणीतील कृषी विद्यापीठ परिसरातील थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिनिंग मालकाच्या मुनिमाच्या कारचा पाठलाग करत पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी कारचालकासह मुनिमावर चाकूहल्ला करत त्याच्या जवळील 18 लाख 92 हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लांबवली. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात हा थरार घडला. या मार्गावर वर्दळ नसल्याचा फायदा घेत पाठलाग करून लूटमार करण्यात आल्याच्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.
सैंधवा (मध्य प्रदेश) येथील व्यापारी सतीश शर्मा यांनी मागील काही महिन्यांपासून लिमला (ता. पूर्णा) येथील मारुती जिनिंग व प्रेसिंग ही फॅक्टरी चालवण्यासाठी घेतलेली आहे. त्यांचे हिशेबनीस आलोक शर्मा हे येथील बँकिंग व्यवहार पाहतात. हिशेबनीस आलोक शर्मा यांनी गुरुवारी सकाळी हैदराबाद स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून 10 लाख रुपयांची रक्कम काढली. त्यानंतर ते मोंढा परिसरातील एका व्यापार्‍याकडे गेले. त्यांनी या रकमेपैकी सहा लाख आठ हजार रुपये त्या व्यापार्‍याला दिले. उर्वरित 3 लाख 92 हजार रुपये घेऊन शर्मा हे वसमत रस्त्यावरील अँक्सिस बँकेच्या शाखेत गेले. तेथे त्यांनी खात्यातून 15 लाख रुपयांची रक्कम काढली. अशी एकूण 18 लाख 92 हजार रुपयांची रक्कम घेऊन ते मारुती कारने (एमपी 09 एचएल 7391) वसमत रस्त्यावरून कृषी विद्यापीठाच्या काळी कमान येथून लिमला येथे जाण्यास निघाले. कृषी विद्यापीठाचा अलीकडचा परिसर ओलांडल्यानंतर ते बलसा रस्त्यावरील महादेव मंदिराच्या पुढे असताना पल्सर मोटारसायकलवरून तिघे त्यांचा पाठलाग करत कारसमोर आले. त्यांनी कार अडवून हातातील लाकडाने समोरील काच फोडली. चालकावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने प्रतिकार केला व घटनास्थळावरून चालक पळून गेला. मागील सीटवर बसलेल्या आलोक शर्मावर त्या तिघांनी चाकूहल्ला करून पैशांची बॅग लांबवली.
पाळत ठेवूनच केला गेम
लूटमारीचा हा प्रकार पाळत ठेवूनच झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. हिशेबनीस आलोक शर्मा हे दिवसभरात कोणकोणत्या बँकांत गेले, तेथून ते कुठे गेले, त्यांनी बँकांतून किती रक्कम काढली, या सर्व बाबींची माहिती घेऊन तिघा चोरट्यांनी पाळत ठेवून पाठलाग केला. त्यांनी लुटण्याचे ठिकाणदेखील निश्चित केलेले असावे. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिसांनी लगेचच तपासास सुरुवात केली.