आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्मठेपेच्या कैद्याचा महिलेवर हल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - जन्मठेपेची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराने फिर्यादीच्या नातलग महिलेवर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना मुखेड न्यायालयाच्या व्हरांड्यात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
कंधार तालुक्यातील दिग्रस येथील सोलंके कुटुंबात वडिलोपाजिर्त इस्टेटीच्या वाटणीवरून भावांत वाद होता. या वादातच 1 डिसेंबर 2010 रोजी भगवान वामन सोलंके (27) याने मोठा भाऊ लक्ष्मण (30) याचा डोक्यात हातोडा घालून खून केला. या प्रकरणी मृताची पत्नी भारतबाईने दिलेल्या तक्रारीवरून वामन सोलंके (55), सोन्याबाई वामन सोलंके (50), शिवाजी वामन सोलंके (35), भगवान वामन सोलंके (27) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिस निरीक्षक आर. एन. स्वामी यांनी तपास करून या प्रकरणी मुखेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमाराला न्या. सी.ए.जाधव यांनी या प्रकरणी भगवान वामन सोलंकेला दोषी ठरवले. जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा त्याला ठोठावण्यात आली. इतरांची पुराव्याअभावी सुटका झाली.
जन्मठेपेची शिक्षा न्यायाधीशांनी सुनावल्यानंतर दोषी भगवान संतप्त झाला. न्यायाधीशांच्या कक्षाबाहेर व्हरांड्यात या खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी फिर्यादी भारतबाई सोलंके व तिची आई मंगलाबाई माधव घरसोडे (रा. गौळ अंबुलगा, ता. कंधार)आल्या होत्या. शिक्षा झाल्यानंतर भगवान हातकडीसह बाहेर आला व त्याने मंगलाबाईवर हल्ला केला. या हल्ल्यात मंगलाबाईच्या डोके व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.