आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Criminals Fashion Show In Front Of Police Officers

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपींचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- विविध गुन्ह्यांतील आरोपींना दत्तक घेण्याची योजना राबविण्यात येत असून त्यानंतर दरमहा पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी आरोपींची ओळखपरेड घेण्यासाठी फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी सहभागी होतील. त्यामुळे एका गुन्ह्यात पकडलेल्या आरोपीचा दुसऱ्या ठिकाणच्या गुन्ह्याशी काही संबंध आहे का, हे शोधणे सोयीचे होणार आहे, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

नांगरे-पाटील गुरुवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मराठवाड्यात आरोपी दत्तक योजना सुरू केली असून आतापर्यंत दीड हजार गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यात अाली आहे. गावगंुडांपासून विविध गुन्ह्यांतील आरोपींवर पाळत ठेवणे, त्यांच्या आर्थिक व्यवहारासह विविध प्रकारची माहिती घेऊन त्यावर नजर ठेवण्यात येईल. तसेच संबंधित ठाण्याचे अधिकारी त्याचे मानसिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. एकंदर गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा प्रयोग राबविण्यात येत आहे. तसेच कामगिरीचा आढावा घेण्यासाठी यापुढे दर तीन महिन्याला रिव्ह्यू घेतला जाणार असून जे अधिकारी, कर्मचारी उत्तम कामगिरी करतील त्यांना स्वरूप लक्षात घेऊन गुण दिले जातील. त्यानंतर रिवार्ड जाहीर करण्यात येतील. मात्र, जे कर्मचारी, अधिकारी कामगिरीमध्ये मागे असतील अशांना सुधारण्यासाठी ३ वेळा संधी दिली जाईल. अन्यथा साइड पोस्टवर टाकण्याची कार्यवाही करण्यात येईल.

यामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यापासून गुन्हेगारांना पकडण्यापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतील. घटनांच्या तपासासाठी स्वतंत्र पथकासह पोलिस अधिकारी देण्यात आले असून प्रत्येक छोट्या ठाण्यात एक तर मोठ्या ठाण्यात दोन अधिकाऱ्यंाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना तपासासाठी आवश्यक साहित्यही पुरविण्यात येत आहे. तपास योग्य पद्धतीने झाल्यास न्यायालयातून निर्दोष सुटण्याचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांनी महामार्गासह वारंवार गुन्हे घडणाऱ्या परिसरात पोलिस गस्त वाढवावी, कायदा-सुव्यवस्था, जातीय सलोखा कायम राहण्यासाठी सर्व धर्मगुरूंना बोलावून धर्म काय शिकवण देतो, याची एकमेकांना माहिती द्यावी, असे आदेश सर्व एसपींना दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे आदी उपस्थित होते.

पोलिसांसाठी वसाहत
देशाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे २ लाख २४ हजार पोलिस कर्मचारी एकट्या महाराष्ट्रात अाहेत. १९६० च्या तुलनेत वाढलेली लोकसंख्या विचारात घेता ही संख्या कमी आहे. त्यामुळे अधून-मधून पोलिस भरती सुरू असते. सध्या असलेल्या शासकीय निवासस्थानातील अपुऱ्या सोयींचा विचार करता पोलिस कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित निवासस्थान प्रकल्प उभारण्याची योजना राबविण्यात येत आहे.

गुन्हेगारांची पार्श्वभूमी समजणे साेयीचे
एखाद्या प्रकरणातील आरोपी अन्य भागातील चोरी किंवा अन्य गुन्ह्यात सहभागी असू शकतो. त्यामुळे त्याची फॅशन शोमध्ये ओळखपरेड करण्यात येईल. त्यानंतर पोलिस अधिकारी त्याचे फोटाे घेतील. हे फोटो सर्व पोलिस ठाण्यात राहतील. गुन्हेगाराला यापूर्वी केलेल्या गुन्ह्याची माहिती विचारण्यात येईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हेगारांची पार्श्वभूमी समजणे सोयीचे जाईल, असे नांगरे-पाटील म्हणाले.