आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचे हित कसले, ही तर स्वहिताची नौटंकी, भाजप-सेनेच्या भूमिकेवर टीकास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून तीन आठवडे झाले तरी राज्यात भारतीय जनता पक्षाचा सत्ताधारी पार्टनर कोण असेल, हे अद्याप स्पष्ट न झाल्याने गतिमान सरकार देण्याचा दावा करणा-या भाजपला नमनालाच खडा लागला आहे. परिणामी, सरकारच्या स्थैर्यासमोरच प्रश्नचिन्ह लागले असून नेमका कोणाचा पाठिंबा घेऊन बहुमत सिद्ध करणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. यासंदभार्त 'दिव्य मराठी"ने मराठवाड्यातील भावना जाणून घेतली. ही चर्चा केवळ गावगप्पाच आहे की काय, अशी शंका सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून काँग्रेस, राष्ट्रवादीवाले तर या प्रकाराला सत्तेसाठी चालू असलेली नौटंकी समजत असल्याचे चाचपणीत समोर आले.
निवडणुकीत अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदरपर्यंत युतीचा तिढा ताणला गेला आणि शेवटी भाजपने एकला चलो रेची भूमिका घेतली. तेव्हापासून सेनेची फरपट सुरू असल्याची भावना शिवसैनिकांत आहे. परंतु निकालांती जनतेने कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थिर सरकारसाठी भाजप-शिवसेना एकत्र येतील, अशी दाट शक्यता होती. पण शिवसेना-भाजपमध्ये राज्यातील आणि केंद्रातील मंत्रिपदांवरून सुरू असलेला तिढा वाढतच चालला होता.

त्यातच गेल्या दोन दिवसांत निर्माण झालेला पेच सुटल्याचे संकेत मिळत असतानाच, रविवारी अचानक त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. भाजपकडून चर्चेला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याचा दावा करत शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे हे नैसर्गिक मित्र पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धूसर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. परिणामी राज्यातील सत्तेची दिशा काय असेल, यावर मंथन सुरू झाले आहे. पाहुयात याबाबत कोण काय म्हणाले ते...
पवारसाहेबांशिवाय अशक्य
गेल्या चाळीस वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांभोवती फिरत आहे. सत्ता कोणाही पक्षाची असली तरी त्यांचा सल्ला घ्यावाच लागतो. त्यामुळे आताही भाजपला स्थिर सरकार द्यायचे असेल, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही. िकंबहुना पवारांचे मार्गदर्शन सत्तेची दिशा ठरवेल. - डी. एन. शेळके, िजल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लातूर
तडजोड स्वीकारावी
बहुमत सिद्ध करण्यासाठी व सत्तेतील सहभागी पक्ष कोण असेल याचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील. परंतु िशवसेनेने तडजोडीची भूमिका स्वीकारल्यास तिढा सुटू शकतो. - नागनाथ निडवदे, जिल्हाध्यक्ष, भाजप, लातूर
स्वाभिमान विकून सत्ता नको
भाजपकडून सतत शिवसेनेचा अपमान केला जात आहे. त्यामुळे स्वाभिमान विकून मिळणारी सत्ता आम्हाला नको आहे. - पप्पू कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख, लातूर
राज्यात निवडणुकीनंतर अस्थिर वातावरण
राज्यातील जनतेने भाजपला विधिमंडळातील सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. त्यामुळे जनतेचा कौल त्यांना स्वीकारता येत नसेल तर हा त्यांचा दोष आहे. राज्यात निवडणुका झाल्यापासून अस्थिर वातावरण आहे. कोण कोणासोबत जाईल आणि आलेले सरकार किती दिवस टिकेल, हेही सांगणे अवघड. - अॅड. त्र्यंबकदास झंवर, माजी जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस, लातूर
शिवसेनेच्या मागण्या अवास्तव
शिवसेनेने मंत्रिमंडळात सहभागी व्हावे ही भाजपची अपेक्षा होती. सेनेला मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून निरोपही देण्यात आला होता. मात्र त्यांनी अवास्तव मागण्या केल्या, त्या पूर्ण करणे शक्य नाही, त्यामुळे त्यांनी शपथ घेतली नाही. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री.
भविष्यात हिंदू मतांचे ध्रुवीकरण
भाजपने मोठेपणा दाखवून समीकरणे जुळवून घ्यावयास हवी होती. आज जरी सत्ता आली असली, तरी शिवसेनेला सन्मानपूर्वक विचारात घेणे गरजेचे असताना भाजपने ते केले नाही. भविष्यात हिंदू मतांच्या ध्रुवीकरणाला या दोन्ही पक्षांना मोठ्या प्रमाणात सामोरे जाण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. संजय जाधव, खासदार, शिवसेना, परभणी
खरे रूप जनतेसमोर आले
केंद्रातील मंत्रिपदांवरून दोन्ही पक्षांत वाद होताच. विधानसभा निवडणुकीत हा वाद अधिकच समोर आल्यानंतर आता शिवसेनेने केंद्रातील मंत्रिपदांबाबत घेतलेली भूमिका ही महाराष्ट्रातील सत्तेच्या राजकारणावरूनच आहे. दोन्ही पक्षांना देशाचे वा महाराष्ट्र घडवण्याचे काहीही देणे-घेणे नाही. - विजय भांबळे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
खात्यासाठी भांडण
शिवसेना सत्तेशिवाय राहू शकत नाही. तसेच भाजपलाही बहुमतासाठी सेना हवी आहे; परंतु महत्त्वाचे म्हणजे जास्त बजेट असणारे खाते कोणी घ्यायचे यावरून हा वाद चालू आहे. महाराष्ट्र हितासाठी योग्य निर्णय घेऊ वगैरे जे काही सांगितले जाते, ती केवळ मीडियाशी बोलण्याची भाषा असून खरी मेख स्वत:चे हित जपण्यात आहे’.- मुनीर पटेल, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, हिंगोली
भाजपची भाषा बदलली
‘शिवसेना आजही भाजपला आपला मित्र मानते. आपल्या जिल्ह्यात आहे तशीच स्थिती राज्यातही असताना जास्त जागा मिळताच भाजपची मात्र भाषा बदलली आहे. मित्र कोणता आणि शत्रू कोणता, हे ओळखण्यात भाजपची चूक होत आहे. हे आपले व्यक्तिगत मत आहे. - संतोष बांगर, जिल्हाप्रमुख शिवसेना
अटी नकोत, पाठिंबा हवाय
आम्ही मागणारे आहोत, तर शिवसेना देणारी आहे. आम्ही पाठिंबा मागितला, त्या बदल्यात काय द्यायचे तेही देणार आहोतच; परंतु शिवसेनेचे नेते सत्तेत सहभागी होण्यासाठी अटी घालत आहेत. मतदार भाजपच्या बाजूनेच आहेत हे हिंगोलीच्याच नव्हे, तर राज्याच्या निकालाने दाखवून दिले असून शिवसेनेने हे मान्य करण्यास काही हरकत नाही.’ - बी. डी. बांगर, जिल्हा सरचिटणीस, भाजप
भूमिका विरोधीच असेल
भाजप व शिवसेनेच्या ज्या हालचाली आहेत. त्यावरून नेमके काय होणार आहे याचा अंदाज आताच बांधता येणार नाही, परंतु राज्यात काँग्रेसची भूमिका तटस्थच आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी सक्षम आहोत. - अशोक पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, बीड
उपमुख्यमंत्रिपदासाठी तणातणी
भाजप व शिवसेनेची निवडणुकीतील युती तुटल्यापासून त्यांच्यात हा वाद सुरू आहे. मंत्रिपदावरून वाद घालणे असेच सुरू राहिले तर भाजपच्या हातातून सत्ता गेल्याशिवाय राहणार नाही. उपमुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी शिवसेनेला लालसा असावी, त्यामुळेच ही तणातणी आहे. - अशोक डक, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, बीड
भाजप बाळासाहेबांना विसरले
भाजपला सध्या बहुमत स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेची गरज वाटत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भाजप विसरले असल्याने ही खेळी आहे, परंतु राष्ट्रवादीच्या भरवशावर त्यांनी राहू नये. राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवून राज्यात स्थापन केलेले सरकार अल्पकाळच टिकेल. - अनिल जगताप, जिल्हाप्रमुख, शिवसेना, बीड