आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके भुईसपाट; बंधारे ओव्हरफ्लो, बदनापूर तालुक्यात ५०० हेक्टरवर नुकसान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बदनापूर - परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोमठाणा धरण केवळ पाच तासांत ओव्हरफ्लो झाले, तर भाकरवाडी, ढासला, मालेवाडी, धामणगाव, निकळक, मांजरगाव, सोयगाव डोंगर, ढोकसाळ आदी गावांना या पावसाचा फटका बसला असून पाचशे हेक्टर अंदाजित शेतीचे नुकसान झाले, तर ढासला गावात शंभर घरे वाहून गेली.

शनिवारी पालकमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी ए. एस. रंगानायक यांनी ढासला, मालेवाडी, मांजरगाव या ठिकाणी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. नुकसान भरपाईच्या दृष्टीने तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याची सूचना महसूल प्रशासनास देण्यात आली आहे.

१७ व १८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील भाकरवाडी, सोमठाणा धरण आेव्हरफ्लो होऊन वाहू लागले. विशेष म्हणजे केवळ पाच तासांतच सोमठाणा भरले. या धरणाचा परिसरातील ४० गावांना फायदा होणार आहे. दुसरीकडे या पावसामुळे मालेवाडी, ढासला, भाकरवाडी, धामणगाव, अकोला, निकळक, धोरण, डोंगरगाव, सायगाव, मांजरगाव, ढोकसाळ आदी गावांतील पाचशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले. ढासला मालेवाडी गावात पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्याचे नुकसान झाले, तर शंभरहून अधिक कच्ची घरे वाहून गेली आहेत. तसेच काही शेतकऱ्यांचे जनावरेदेखील वाहून गेली आहेत. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाकडून कार्यवाही : बदनापूर तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पाच तासांत सोमठाणा धरण भरले. तर भाकरवाडी धरणदेखील आेव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या पावसामुळे ११ ते १२ गावांत जवळपास पाचशे हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. भाकरवाडी, ढासला गावात घराचे व अन्नधान्याचे नुकसान झालेले आहे. मदतीच्या दृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही केली जात असल्याची माहिती तहसीलदार बालाजी क्षीरसागर यांनी दिली.
केळणेला पूर; रस्ता दुसऱ्या दिवशीही बंद
भोकरदन - तालुक्यात १७ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाने केळणा नदीला मोठा पूर आला आहे. १८ सप्टेंबर पासून भोकरदन-आलापूर उस्मानपेठकडे जाणारा रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत होते. १९ सप्टेंबर रोजीही हा रस्ता बंद होता.

जुई धरणात १३ फूट पाणी जमा झाले आहे. भोकरदन शहरासह २० गावांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या दानापूर येथील जुई धरणामध्ये १९ सप्टेंबर रोजी पाण्याचा ओघ सुरू होता. धरणात सध्या ३.५१८ दलघमी पाणीसाठा आला असल्याची माहिती सिंचन शाखा क्रमांक दहाचे उपविभागीय अधिकारी आर. डी. आल्टे यांनी दिली. नांजा येथे पावसामुळे पूर्णा नदीच्या काठावरील मारुती मंदिरासमोर खड्डा पडला त्यातील पाणी निघून गेल्यानंतर भुयार पडले.
सांडवा खोदून पाणी सोडल्याने अनर्थ टळला
तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या दमदार पावसामुळे सर्व नद्यांना व आेढ्यांना पूर आला होता. पिंपळगाव कोलते येथील जिल्हा परिषदेचा पाझर तलाव पूर्ण भरला होता. तलावाच्या सांडव्यातून पाणी जात नसल्याने फुटण्याची स्थिती िनर्माण झाली होती. मात्र, प्रशासनाच्या वतीने जेसीबी पाठवून सांडवा खोदण्यात आल्याने अनर्थ टळला. केळणा, पूर्णा, जुई, धामणा नद्यांना पूर आला आहे. हसनाबाद परिसरात पूर्णा नदी दुथडी वाहू लागल्याने परिसरातील शेतात पाणी घुसले. पिंपळगाव कोलते, सावखेडा येथील अंजना नदीला मोठा पूर आल्याने गावांना पाण्याने वेढले या पुरात दोन बैल व एक दुकान वाहून गेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पुढील स्‍लाईडवर पाहा, तीर्थपुरी परिसरातील जोगलादेवी बंधारा..