आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कावळ्यांनी कोंडले कुटुंबाला घरात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मांजरीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर नालीत पडलेल्या कावळ्याला उचलून दुस-या ठिकाणी नेत असल्याचे पाहून इतर तीन कावळ्यांनी हनिफ शरीफ यांच्यावर हल्ला करत त्यांना जखमी केले. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या शरीफ कुटुंबातील लोक घराबाहेर आले की, कावळे त्यांच्यावर तुटून पडतात. त्यामुळे कुटुंब भेदरून गेले आहे. विशेष म्हणजे ‘त्या’ मांजरीवरही कावळ्यांनी वॉच ठेवला आहे.
कारंजा भागातील जव्हेरी गल्लीत महंमद शरीफ राहतात. त्यांच्या घरासमोरील चिंचेच्या झाडावर कावळ्यांची गर्दी असते. शनिवारी सायंकाळी शेजारी राहणा-या क्षीरसागर यांच्या घरातील मांजरीने हल्ला करत एका कावळ्याचा जीव घेतला. मेलेला पक्षी कोणीतरी मोहंमद शरीफ यांच्या घरासमोर नालीत टाकला. दुर्गंधी सुटू नये म्हणून शरीफ यांचा मुलगा हनिफने मृत कावळा उचलला एवढ्यात झाडावरील तीन कावळ्यांनी कावकाव सुरू झाली. सर्व कावळे हनिफवर तुटून पडले. हातातील मृत कावळ्याला जागीच सोडून त्याने धूम ठोकली. काही वेळाने मोहंमद शरीफ हे बाहेरून घरी आले तेवढ्यात कावळ्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. ते किरकोळ जखमी झाले. जो कोणी शरीफ यांच्या घरातून बाहेर येईल त्याच्यावर कावळे हल्ला करत. कावळ्यांच्या हल्ल्यामुळे शरीफ यांचे कुटुंब हादरून गेले आहे. विशेष म्हणजे ज्या मांजरीने कावळ्याला मारले त्या मांजरीवरही इतर कावळ्यांनी हल्ला केला आहे. या प्रकरामुळे क्षीरसागर यांच्या घरात पळून गेलेली मांजर दोन दिवसांपासून बाहेर आली नाही. शरीफ यांच्या घरातील लोक आधी कावळे बाहेर आहेत का हे पाहूनच घराबाहेर येतात. 24 तासांपासून कावळे शरीफ यांच्या घराबाहेर बसलेले असून त्यांचे हे प्रकार सुरूच आहेत.
माझ्यावरही झडप - भावाला भेटायला मी घरी आलो होतो. कावळे हल्ला करतात ही बाब मला माहीत नव्हती. मी घरात जात असताना अचानक काही कावळ्यांनी माझ्यावर हल्ला केला. मी कसाबसा घरात गेलो. त्यानंतर माझ्या भावाने मला सर्व प्रकार सांगितला.’ - मोहंमद रऊफ, शरीफ यांचे भाऊ