आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रुझर पुलावरून कोसळल्याने दोन ठार, आठ जण गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - नाशिक येथील विवाह सोहळा आटोपून जालन्याकडे परतणाऱ्या वऱ्हाडींची क्रुझर (एमएच २१ व्ही ०११५) चालकाचा ताबा सुटल्याने जालना-औरंगाबाद महामार्गावरील मात्रेवाडी पेट्रोल पंपाजवळ पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दोन ठार, तर आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच वाजेदरम्यान घडली. नर्मदाबाई रावसाहेब जाधव (५५), मानसिंग रूपसिंग दळवी, (३८ दोघेही रा. सटवाई तांडा, जालना) अशी मृतांची नावे आहेत.

जालना शहर परिसरातील सटवाई तांडा येथील वऱ्हाडी नाशिक येथे लग्नासाठी सोमवारी गेले होते. लग्न झाल्यानंतर वऱ्हाडी नाशिकहून क्रुझर गाडीने जालन्याकडे परतत होते. बुधवारी पहाटे क्रुझर बदनापूरजवळ आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला गाडी रस्ता सोडून थेट नदीत कोसळली.

या अपघातात नवऱ्यामुलाची आई नर्मदाबाई जाधव तसेच त्यांचा जावई मानसिंग दळवी हे दोघे जागीच ठार झाले. याशिवाय गाडीतील इतर आठ जण जखमी झाले अाहेत. यात सुनीता राजेश जाधव (२५), आरती राजू गांगुर्डे (१२), गायत्री राजू गांगुर्डे (१३), नारायण कैलास राठोड (३२, चालक, पाटेगाव, जि. जालना), गणेश रावसाहेब जाधव (३०), अशोक रामराव पवार (३२), अशोक तान्हाजी पवार (३०), लहू संतराम गारखेडे (३०, सर्व रा. सटवाई तांडा, जालना) यांचा समावेश आहे. आरती गांगुर्डे हिला पुढील उपचारांसाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू अाहेत. मृत दोघांचेही शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात आले असून त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बदनापूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल एस. ए. शिवणकर यांनी दिली. दरम्यान, गणेश जाधव यांच्या फिर्यादीवरून निष्काळजीपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक नारायण राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना ३० किलोमीटर असताना दुर्घटना
नाशिकयेथे लग्न झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळी क्रुझर गाडीने जालन्याकडे परतत होती. त्यांचा जवळपास २०० किलोमीटरचा प्रवास चांगला झाला होता. मात्र, जालना केवळ ३० किलोमीटर अंतरावर असताना ही दुर्घटना घडली.

फोटो - बदनापूरजवळील मात्रेवाडी पुलावरून खाली कोसळल्यानंतर क्रुझर गाडीची अशी अवस्था झाली.
बातम्या आणखी आहेत...