आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळा पैसा 20% कमिशनवर पांढरा; बँक कर्मचारी अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्ह्यातील उदगीर येथे बँक आॅफ महाराष्ट्रमधून १८ लाखांच्या नोटा बदलून दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच लातुरातील आंध्र बँकेचेही दोन अधिकारी व्यापाऱ्याला ११ लाखांची रक्कम बदलून देत असताना रंगेहाथ सापडले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला अाहे.

हिमांशू राजबहाद्दूर सिंह (रा. आलापूर, उत्तर प्रदेश), शिशुपाल राजपालसिंह आर्य (रा. सोलापूर) आणि मनोज भानुदास घार (रा. लातूर) अशी आरोपींची नावे आहेत. हिमांशू सुभाष चौकातील आंध्र बँकेत सहायक व्यवस्थापक, तर शिशुपाल हा त्याच बँकेत कॅशियर आहे. मनोज हा आडत व्यापारी आहे. बँकेचे अधिकारी व्यापाऱ्याला कमिशन घेऊन जुन्या हजार व पाचशेच्या नोटा बदलून देणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी सापळा रचून तिघांना रंगेहात अटक केली.

शनिवारी रात्री अंबाजोगाई रस्त्यावरील एसटी वर्कशॉपसमोर तिघे आरोपी आले असता पोलिसांच्या पथकाला त्यांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यामुळे सोनटक्के यांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्या खिशात, जॅकेटात नव्या दोन हजारांच्या ११ लाखांच्या नोटा मिळून आल्या. आडत व्यापारी घार याच्याकडून २० टक्के कमिशनवर त्याच्याकडील जुन्या पाचशे व हजारांच्या नोटा घेऊन त्याला दोन हजारांच्या नोटा देत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी ११ लाखांच्या नोटा जप्त केल्या आहेत. मनोज घार आडत व्यापारी आंध्रा बँकेचा कर्जदार आहे. त्याने बँकेतून दोन कोटींची सीसीही घेतली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना रविवारी न्यायालयासमोर उभे केले. न्यायाधीशांनी तिघांनाही २९ नोव्हेंबरपर्यंत पेालिस कोठडी सुनावली आहे.

लातुरात तिसरा प्रकार
लातूर जिल्ह्यात बँकेतून कमिशनवर नोटा बदलण्याची तीन प्रकरणे उघड झाली. उदगीर बँक ऑफ महाराष्ट्रात १८ लाख बदलून दिल्याच्या प्रकरणात ४ कर्मचारी निलंबित झाले. नंतर राज्य परिवहन महामंडळाच्या उदगीरच्या २ अधिकाऱ्यांवर १ लाख ४७ हजारांच्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...