आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलन तुटवडा : बीड जिल्ह्यातील ९० गावे कॅशलेस होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड : नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बीडच्या जिल्हा प्रशासनाने पुढचे पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील एकूण १९ बँकांद्वारे पहिल्या टप्प्यात ९० गावे कॅशलेस करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी बँकांना दिले अाहेत. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. दरम्यान, राेखीचे व्यवहार केले जाऊ नयेत यासाठी बँकांकडून गावागावांतून जागृतीही सुरू झाली अाहे.

जिल्ह्यात नाेटाबंदीमुळे बाजारपेठेमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले असून केवळ ३० डिसेंबर २०१६ नंतर काय घाेषणा हाेईल, यामुळे माेठमाेठे व्यवहार प्रलंबित ठेवले जाऊ लागले अाहेत. पैसे काढण्यासाठी बँकांपुढे रांगाच रांगा दिसत असून जिल्ह्यातील १४१ एटीएमपैकी अनेक एटीएम राेकडअभावी रिकामे आहेत. यामुळे नव्याने घेणाऱ्या वस्तू व चैनीच्या बाबी खरेदी करणाऱ्यांचा कलही कमी झाला अाहे. दैनंदिन व मूलभूत गरजा भागवण्यासाठीच्या
वस्तू खरेदी करण्यावर नागरिक भर देऊ लागले अाहेत. कॅशलेस व्यवहारासाठी बँक प्रशासनाकडून गावे निवडली जात आहेत.

११ प्रकारे करा कॅशलेस व्यवहार : माेबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, पीअाेएस (स्वाइप), डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एसबीअाय बडी, ट्रान्सफर ट्रान्झॅक्शनमध्ये एनईएफटी, अारटीजीएस, चेक, डीडी, डेबिट स्लिप अशा अकरा प्रकारे विविध बँकांकडून नागरिकांना कॅशलेस व्यवहार करता येऊ शकतील.

एसबीअायकडून पाटाेदा शहर दत्तक : स्टेट बँक अाॅफ इंडिया बँकेने पाच गावांची निवड केली. त्यात पाटाेदा शहरात काही दिवसांत कॅशलेस व्यवहार हाेणार अाहेत. पाटाेद्यातील १५ हजार नागरिकांसाठी बँकेकडून जनजागृती सुरू करण्यात आली अाहे. येथे नियमितचे १० हजार अाणि ४० हजार जनधनचे खातेदार अाहेत. एसबीअाय, एसबीएच, एमजीबी अशा तीन, सहकारी दाेन व पतसंस्था, मल्टिस्टेट अशा पाच बँका अाहेत. या बँकांकडून ९० गावांतील विविध ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून कॅशलेस व्यवहारासाठी जागृती सुरू झाली आहे.
डेबिट व क्रेडिट कार्डवर सेवा शुल्क : डेबिट कार्डद्वारे नागरिकांनी कॅशलेस व्यवहार करत दाेन हजार रुपयांपर्यंत खरेदी केल्यास ०.७५ टक्के (म्हणजे दीड रुपये) सेवा शुल्क लागणार अाहे. तसेच दाेन हजार रुपयांच्या पुढे व्यवहारातून खरेदी केल्यास १.१५ टक्के प्रमाणानुसार सेवा शुल्क अाकारणी केली जाणार अाहे. क्रेडिट कार्डद्वारे दाेन हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक व्यवहारातून खरेदी केल्यास २.५ टक्के प्रमाणानुसार सेवा शुल्क बँक खात्यावरून कपात हाेणार अाहेत.

बीड
- एकूण बँका : १९
-शाखा : २०३
-गावांची संख्या : १४०३
- एका बँकेस कॅशलेस गावांची संख्या : प्रत्येकी ५
- कॅशलेस गावांची एकूण संख्या : ९०

राेकडसाठी अन्य जिल्ह्यांकडे धाव
जिल्ह्यामध्ये एकूण १९ बँकांची संख्या असून त्यांच्या ११ तालुक्यांमध्ये २०३ शाखा अाहेत. नऊ बँकांच्या तालुक्याच्या ठिकाणी रिझर्व्ह बँकेकडून राेकड उपलब्ध केली जाते. यात स्टेट बँक अाॅफ हैदराबादच्या बीड, अंबाजाेगाई, अाष्टी, गेवराई, परळी, केज, माजलगाव, पाटाेदा अाणि स्टेट बँक अाॅफ इंडियाच्या परळी शाखेचा समावेश अाहे.
सध्या या सर्व ठिकाणी केवळ ४६ काेटींपर्यंतची राेकड असल्याने ती कमी पडत आहे. राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून ग्राहकांची गैरसाेय टाळण्यासाठी नगर, नाशिक, पुणे, साेलापूर, जामखेड, परळी या बँकांकडून राेकड उपलब्ध करून दिली जात अाहे, अशी माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...