आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटवी शिवारातील जंगलात झाडांची सर्रास कत्तल, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - संवेदनशील अजिंठा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नाटवी शिवारातील जंगलात राजरोसपणे वड व उंबर यांसारख्या झाडांची कत्तल सुरू आहे. मात्र, याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे पाहावयास मिळत अाहे. गुरुवारी ग्रामस्थांसह ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांनी झाडांची कत्तल होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला.

अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या वाघेरा, आमसरी, वडाळी व नाटवी शिवारात अवैध वृक्षतोड केली जात आहे. सिल्लोड तालुक्यातील मोठा संवेदनशील वनपरिसर असलेल्या अजिंठ्यास निसर्गाने अनमोल वनसंपदा बहाल केली आहे. मात्र, ही वनसंपदा टिकवून ठेवण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. या जंगलात उंबर, वड, सागवान, निंब, मोह, पळस यासंह वनौषधीची झाडे आहेत. तसेच जंगलात बिबटे,
नीलगाई, हरिण, रानडुकरे आदी वन्यजीवांचाही वावर आहे. परंतु जंगलात सुरू असलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. चोरट्या मार्गाने सुरू असलेली झाडांची कत्तल त्वरित राेखण्याची मागणी सुनील काळे यांनी वन विभागाकडे केली आहे. या वेळी संजय गव्हाणे, जगदीश काळे, संदीप बावस्कर यांनी पाहणी करून वन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कारवाईची प्रक्रिया सुरू
लाकडांची वाहतूक करताना एक ट्रॅक्टर ताब्यात घेऊन त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. तोडलेली झाडे जंगलातली नसून ती गायरान जमिनीवरील आहेत. - डी. एम. पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, अजिंठा वनपरिक्षेत्र .
असा उघडकीस आला प्रकार
नाटवी शिवारातील जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी गेलेल्या एक ग्रामस्थाला वृक्षतोड झाल्याचे आढळून आले. याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली. येथील वन समितीचे अध्यक्ष मोतीराम कालभिले यांनी ग्राम सुरक्षा दलाचे प्रमाेद कालभिले, कृष्णा दौड, समाधान कालभिले, उमेश कालभिले, अनिल काकडे यांना जंगलाकडे पाठवले. त्या वेळी जंगलातून एक ट्रॅक्टर तोडलेली लाकडे घेऊना जाताना दिसून आले.