आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायचे होते मास्तर, मात्र चैनीसाठी झाला चोर !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- डीएड उत्तीर्ण करून सीईटीची तयारी करीत असलेल्या त्या तरुणाला खरे तर शिक्षक व्हायचे होते. नोकरी लागेपर्यंत शिक्षण घेण्यासाठी त्याच्या घरातील आर्थिक परिस्थितीही तशी चांगलीच होती. मात्र, चैनीसाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे या भावी शिक्षकाने आणि त्याच्या गॅरेजवाल्या मित्राने शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न केला. चक्क मोटारसायकलींची चोरी सुरू केली अन् एका गाफील क्षणी ते पोलिसांच्या हाती लागले.
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील मोरवड गावच्या नारायण घोडके नावाच्या तरुणाची ही कथा. नारायण हा डीएड उत्तीर्ण तरुण. शिक्षकाची नोकरी मिळवून एक चांगले आयुष्य जगण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने राज्य शासनाकडून घेतल्या जाणार्‍या डीएड सीईटीची परीक्षा देण्यासाठी लातूरमध्ये येऊन एक कोचिंग क्लासही जॉइन केला. शहरात आल्यानंतर त्याला चैनीचे आयुष्य जगण्याची सवय लागली. हॉटेलिंग, बाइकवरून फिरणे, मोबाइल, चॅटिंग यासाठी घरून पाठवलेले पैसे कमी पडू लागले. त्याने ही बाब त्याचा जवळचा मित्र सिद्धार्थ जाधवला सांगितली. सिद्धार्थ त्याच्याच मोरवड गावचा रहिवासी असून तो सध्या अंबाजोगाईतल्या गॅरेजमध्ये काम करतो. सिद्धार्थने नारायणला पैसे कमावण्याचा शॉर्टकट सांगितला. शहरातल्या गाड्या चोरायच्या त्या अंबाजोगाईला आणून सिद्धार्थच्या ताब्यात द्यायच्या आणि सिद्धार्थने त्या विकून आलेले पैसे दोघांनी वाटून घ्यायचे, असा प्लॅन बनवण्यात आला.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका मोटारसायकल चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला. त्याआधारे तपास करीत पोलिस नारायणपर्यंत पोहोचले आणि या दोघांचे बिंग उघडे पडले. पोलिसांना या दोघांकडे पाच मोटारसायकली आढळून आल्या असून त्यांनी आणखी काही मोटारसायकलींची चोरी केली आहे काय, याचा तपास सुरू आहे.

मौजमजेसाठी चोरीचा मार्ग
विशेष म्हणजे नारायणने आपल्या वडिलांना मोरवड गावात 18 एकर शेती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चांगल्या घरातील एक शिक्षित तरुण केवळ चैनीसाठी चोरीच्या व्यवसायात पडल्याचे प्रदमदर्शनी स्पष्ट झाले आहे.