आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीचा दुग्ध व्यवसायाला फटका, शेतकऱ्यांची कोंडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईट - केंद्र शासनाने चलनातून ५०० व १००० च्या नोटा रद्द केल्याची घोषणा ८ नोव्हेंबर रोजी केली. या नोटाबंदीचा सध्या भूम तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला मोठा फटका बसताना दिसत आहे. नोटाबंदीच्या आदेशापासून दुग्ध व्यावसायिकांकडून बंद झालेल्या नोटा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, त्या स्वीकारण्यास शेतकरी तयार नसल्याने महिनाभरापासूनचे पेमेंट थकले आहे. पेमेंट नसल्याने खिशात सुटे पैसही नाहीत. परिणामी जागोजागी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत अाहे.

भूम तालुक्यातील ईट व परिसरात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यातून प्रत्येक आठवड्याला लाखोंची उलाढाला होते. या व्यवसायामुळे अनेक बेरोजगारांनाही स्वयंरोजगार मिळाला आहे. तसेच दुधालाही बाजारपेठ मिळाली आहे. दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना डेअरी व खवा भट्टीधारकांकडून प्रत्येक महिन्याच्या ५, १५ व २५ तारखेला पैसे अदा केले जातात. यातूनच मिळणाऱ्या रकमेतून आठवडाभराचा घरखर्च भागवला जातो. परंतु, ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय झाल्यापासून दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना व्यावसायिकांकडून पाचशे व हजाराच्या नोटा दिल्या जात आहेत. सदरील नोटा बाजारपेठेत चालत नसल्याने शेतकऱ्यांकडून त्या नाकारल्या जात आहेत. परिणामी महिनाभरापासून पेमेंटच झालेले नसून याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे शेतकऱ्यांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास विरोध होत असल्याचे बरोबर असले तरी दुसरीकडे खात्यावर पैसे जमा करण्यास शेतकऱ्यांकडून विरोध होत असल्याने शेतकरी व व्यावसायिक यांच्यामध्ये संघर्ष उडताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून ५० व १०० च्या नोटांची मागणी होत आहे. यामुळे खवाभट्टी चालक व दूध संकलन करणाऱ्यांपुढे प्रश्न निर्माण होत आहे.

पगार थकल्याने उधारी वाढतेय : शेतकऱ्यांचा पगार थकल्याने त्यांची दुकानासह विविध ठिकाणी उधारी वाढत चालली आहे. तर काही शेतकरी अडचण लक्षात घेऊन खाते क्रमांक देत आहेत. परंतु, अनेकांना बँकेसमोर रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीत.

चलनाचा तुटवडा
दूध संकलन केंद्राकडून ५०० च्या नोटा येतात किंवा खात्यावर पगार करू असे सांगितले जाते. शेतकरी खात्यावर पैसे जमा करण्यास तसेच ५०० च्या नोटाही स्वीकारण्यास तयार नाही. एवढी रक्कम कोणत्याच बँकेतून मला रोख मिळत नाही. एवढे सुटे पैसे आणायचे कोठून?
आकाश भोसले, दुग्ध संकलन केंद्रचालक.

घरप्रपंचाचा मोठा प्रश्न
तीन आठवडे झाले, मात्र अजूनही पगार झाला नाही. यामुळे अनेकांचे देणे बाकी आहे. या नोटबंदीचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. पगार नसल्यामुळे घरप्रपंच कसा भागवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडत आहे.
सोमनाथ डोके, दुग्ध उत्पादक शेतकरी, ईट.
बातम्या आणखी आहेत...