पिंपळगाव रेणुकाई- पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सोजीराम शिवराम मादणकर असे मृताचे नाव आहे. मंगळवारी रात्री पिंपळगाव रेणुकाई येथे खरेदीसाठी आल्यानंतर रेलगाव या आपल्या गावी परत जाताना पुलावरील पाण्यात ते वाहून गेले.
सोजीराम शिवराम मादणकर (५०, रेलगाव, ता.भोकरदन) हे मंगळवारी आपल्या मोठ्या भावाचा अंत्यसंस्कार आटोपून पिंपळगाव रेणुकाई येथे बाजारासाठी आले होते. मात्र ते घरी परत न आल्याने घरातील नातेवाइकांनी त्यांचा सगळीकडे शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. दरम्यान, गुरुवारी पिंपळगाव रेणुकाई येथे नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर रेलगाव येथील ग्रामस्थांनी पिंपळगाव रेणुकाई येथे धाव घेतली व त्यांचा मृतदेह बाहेर काढला. मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर आला हाेता. त्यानंतर रात्री पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने मादणकर पुरात वाहून गेले, असे ग्रामस्थांनी सांगितले.
बीड: पाऊस सक्रिय, मांजरसुंब्यात अतिवृष्टी
चार आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. जिल्ह्यातील पाटोदा, अंबाजोगाई, केज, परळी तालुक्यात पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथे ७४ मि.मी. पाऊस पडला असून अतिवृष्टीची नाेंद झाली अाहे. आजपर्यंत अपेक्षित पावसाशी प्रत्यक्षात पडलेल्या पावसाची टक्केवारी ९७.९ मिलिमीटर आहे. गेवराई तालुक्यातील दहापैकी सहा महसुली मंडळांत चांगला पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात १८ मिमी पाऊस जिल्ह्यात झाला.
नांदेड : आतापर्यंत २७ टक्के पावसाची नोंद
नांदेड- जिल्ह्यात गुरुवार, २० जुलै रोजी सकाळी ८ वा. संपलेल्या २४ तासांत सरासरी ८.५४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली अाहे. जिल्ह्यात दिवसभरात एकूण १३६.५६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी २५७.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६.९९ टक्के एवढा पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे : नांदेड- ११.५०, मुदखेड- ४, अर्धापूर- १४, भोकर- ५.५०, उमरी- ८, कंधार- १५.१७, लोहा- ३.१७, किनवट- १.७१, माहूर- १, हदगाव- ८.५७, हिमायतनगर-४.३३ मिमीची नोंद झाली.