जालना - शहरातील अमरधाम स्मशानभूमीत शनिवारी सकाळी आठच्या सुमारास जळत्या चितेवर आणून टाकलेल्या मृतदेहाची ओळख पटली
आहे. सचिन निर्मळ (35, कालीकुर्ती, नवीन जालना) असे मृताचे नाव आहे.
सचिन तीन दिवसांपासून घरातून निघून गेला होता. नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. यातच शनिवारी सकाळी अमरधाम स्मशानभूमीत जळत्या चितेवर त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक ईश्वर वसावे, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी घटनास्थळी भेटी देऊन पाहणी केली. तसेच श्वानपथकानेही माग घेतला. मात्र, पोलिसांच्या हाती कुठलाच सुगावा लागला नाही. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या वर्णनाबाबत सविस्तर माहिती घेऊन त्या दिशेने तपास केला. यात ही व्यक्ती पेंटिंगची कामे करत होती. काही दिवसांपूर्वी काम करताना त्याच्या पाठीला व हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर वैद्यकीय उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात आली होती, अशी माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून सचिन अस्वस्थ होता. तीन दिवसांपासून तो बेपत्ता होता. शनिवारी अमरधाम स्मशानभुमीत त्याचा मृतदेह जळत्या चितेवर आढळून आला. मृतदेहाजवळ चपला होत्या. त्या सचिनच्याच असल्याचे नातेवाइकांनी ओळखले, असे पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी सांगितले.