आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतावस्थेत बिबट्या आढळला, वसमत तालुक्यातील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - वसमत तालुक्यातील मरसूळवाडी शिवारात सोमवारी सकाळी ५ वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. आठ दिवसांपूर्वी याच बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाल्याने त्याचा शोध चालू होता. रविवारी बिबट्याचे दर्शन झाल्यानंतरही वन विभागाच्या पथकाने हलगर्जीपणा दाखवल्याने तो जिवंत सापडू शकला नाही.

मरसूळवाडी रेल्वेस्टेशन भागात बिबट्या असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही वन विभागाच्या कर्मचा-यांनी १२ दिवसांनंतर त्याला पिंज-यात अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. रविवारी दुपारी सीताराम साबळे यांच्या शेताजवळ बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर पिंजरा आणण्यासाठी सहा तास लागले आणि सायंकाळी ६ वाजता मरसूळवाडी शिवारात पिंजरा लावण्यात आला. पिंज-यात ठेवण्यात आलेले शेळीचे पिल्लू रात्रभर ओरडत असतानाही बिबट्या तिकडे फिरकला नाही. सकाळी वन विभागाचे कर्मचारी पिंज-याचे निरीक्षण करण्यासाठी गेले असता पिंज-यात शेळीचे पिल्लू दिसले, तर थोड्याच अंतरावर झाडांमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळला.

...तर बिबट्या वाचला असता
१२ दिवसांपूर्वी मरसूळवाडी भागात बिबट्या आढळल्यानंतर शेतक-यांकडून वन विभागाला माहिती देण्यात आली होती; परंतु वन विभागाने चालढकल केली आणि शेवटी मृत बिबट्याच हाती लागला. लागलीच त्याला पकडले असते तर तो आजारी आहे की नाही याचेही निदान झाले असते आणि त्याचे प्राणही वाचले असते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात कनेरगाव नाका भागात कयाधू नदीच्या काठी दोन वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता.

न्यूमोनियाने मृत्यू झाल्याची शक्यता
‘बिबट्याची शिकार झाल्याचे शवविच्छेदनावरून तरी दिसून येत नाही; परंतु प्राथमिक अंदाजानुसार त्याचा मृत्यू न्यूमोनियाने झाला असण्याची शक्यता आहे. त्याचा व्हिसेरा पुणे आणि औरंगाबाद येथील प्रयोगशाळांना पाठवण्यात आला असून त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल.’ - डॉ. अजय मुस्तुरे